संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रिपदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. पूर्ण बहुमतानं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीचा तब्बल 232 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. मात्र त्यानंतर झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावललं गेलं होतं. यामध्ये छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता.
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज होते, त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आरोग्याचं कारण सांगून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल करत सूचक इशारा दिला आहे. त्यांनी उद्याच्या संपादकीय बाबत एक ट्विट केलं आहे. त्यांनी भुजबळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोखाली ‘फडणवीस, मिंधे… भुजबळांच्या मांडीचे काय करणार? ‘ अशी एक ओळ आहे. हा फोटो पोस्ट करताना उद्याचे संपादकीय जळजळित आणि खणखणीत असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या उद्याच्या संपादकीयमध्ये काय असणार? याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे.
सामना
उद्याचे संपादकीय…!
जळजळित आणि खणखणीत!
@Dev_Fadnavis
@BJP4Mumbai
@cbawankule pic.twitter.com/pbwahYVW2p— Sanjay Raut (@rautsanjay61) May 20, 2025
दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारावेळी छगन भुजबळ यांना संधी मिळाली नव्हती, मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भुजबळांचं स्वागत केलं आहे. तसेच माझ्यात आणि भुजबळांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भुजबळ मंत्री झाल्यानं त्यांचा फायदा नाशिक आणि महाराष्ट्राला होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List