मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे, पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, मोठं नुकसान झालं आहे. तर काही भागांमध्ये दुर्घटना देखील घडल्या आहेत.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री होणार आहे. मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये होण्याची शक्यता आहे. दर वर्षी एक जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होतं. मात्र यावर्षी एक जूनच्या आधीच केरळमध्ये पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकून परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर 2009 नंतर पहिल्यांदाच वेळेआधी केरळात मान्सूनच आगमन होणार आहे. 2009 साली 23 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनची लवकर एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
कोकणाला रेड अलर्ट
दरम्यान पुढील 48 तास धोक्याचे आहेत. हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी कोकणात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून, उद्या देखील मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List