पोटाची खळगी भरताना आयुष्याचा झाला कोळसा, पिढीजात व्यवसायाला महागाईची झळ

पोटाची खळगी भरताना आयुष्याचा झाला कोळसा, पिढीजात व्यवसायाला महागाईची झळ

लाकडापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय काही भटक्या जमाती पिढीजातपणे करत आहेत. या व्यवसायावरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या कष्टाने लाकडाची भट्टी लावून, कोळसा तयार करण्यात येतो. मात्र, या कोळशाच्या विक्रीतून अतिशय तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल होते. आजही अनेक कुटुंबे गावागावांमध्ये फिरून परंपरागत हा व्यवसाय करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशी कुटुंबे दिसून येतात. सध्या माण तालुक्यातील वरकुटे येथील माणगंगा नदीकिनारी हा व्यवसाय करणारी काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर, लाकडाचा कोळसा करण्याच्या नादात आयुष्याचाच कोळसा झाला आहे, अशी खंत ते व्यक्त करत आहेत.

रायगड जिल्हातील सुधागड तालुक्यातून आलेली अनेक कुटुंबे गेल्या काही महिन्यांपासून सध्या वरकुटे येथील माणगंगा नदीकिनारी वास्तव्यास आहेत. काटेरी वनस्पती तोडून त्याच्या लाकडाची भट्टी लावून त्यापासून कोळसा तयार करून तो ठेकेदारांमार्फत विकण्याचे काम करीत आहेत.

हा व्यवसाय करणारे सुरेश वाघमारे व रोशन वाघमारे यांनी सांगितले की, या व्यवसायात आम्ही आमच्या वाडवडिलांपासून आहोत. गावागावांमध्ये फिरून तेथील काटेरी वनस्पती तोडून लाकडाची भट्टी लावून आम्ही कोळशाचे उत्पन्न घेतो. परंतु, आम्हाला केवळ पोटापुरतेच उत्पन्न मिळते. परंतु, आमच्या या व्यवसायात ठेकेदारी पद्धत वाढल्याने आम्हाला कोळशाच्या एका पोत्यामागे केवळ 150 रुपयेच मिळतात. गेल्या काही वर्षांपासून आम्ही हा दर घेत आहोत. त्यामध्ये मागणी करूनही वाढ मिळत नाही. आमच्या मागणीची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे मिळेल त्या उत्पन्नातून आम्हाला आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

कोळसा तयार करण्यासाठी नदीकिनारी किंवा मोकळ्या जागेत वाढणाऱ्या काटेरी वनस्पती असलेल्या जागा शोधून, त्यांच्या मालकांना पैसे किंवा रान सरळ व पिकाऊ करून द्यावे लागते. यामध्ये होणारा खर्च आम्हालाच करावा लागतो. ठेकेदारामार्फत आम्ही तयार झालेला कोळसा विकतो. हाच कोळसा शहरांमधून उद्योगांसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या किमतीला विकला जातो.

भट्टी लावल्यानंतर पावसामुळे किंवा अन्य कारणांनी ती विझू नये, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला भट्टी शेजारीच वास्तव्य करावे लागते. येथे टाकलेल्या पालातच आमचा संसार चालतो. सध्या आम्ही आई, वडील, पत्नी व लहान मुलांना घेऊन इथे राहत आहोत. भट्टीच्या वासामुळे कोणताही प्राणी, साप, विंचू फिरकत नाही. तसेच, आमच्याजवळ सोने, पैसा नसल्याने चोरांचीही भीती नसल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. कुटुंबातील मोठी मुले आश्रमशाळेत शिकतात. अन्यथा, गावाकडे आमच्या वयस्कर आजी, आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवली जातात आणि लहान मुले आमच्याबरोबर राहतात.

आमच्या आई-वडिलांनी हाच व्यवसाय केला. आम्हाला शाळेत घातले नाही. पण आम्ही ती चूक करणार नाही. मुलांना शाळा शिकवणार. या व्यवसायात त्यांना आणणार नाही. पोटाची खळगी भरण्याच्या नादात आमच्या आयुष्याचा कोळसा झालाय, आता मुलांच्या आयुष्यात मात्र शिक्षणाची पहाट फुलवणार असल्याचेही वाघमारे बंधूनी सांगितले.

असा तयार होतो कोळसा

लाकडे तोडून त्याचे तुकडे करून त्याची भट्टी लावावी लागते. एका भट्टीपुरती लाकडे तोडून त्यांची खांडके करायला 20 ते 25 दिवस लागतात. त्यानंतर योग्य जागा निवडून भट्टी लावावी लागते. भट्टीतून कोळसा मिळायला आठवड्यापासून सुरुवात होते. एक भट्टी लावल्यापासून साधारणपणे एक महिनाभर चालते. त्यातून 100 ते 125 पोती कोळसा तयार होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातही मोठय़ा प्रमाणात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी...
सैफ अली खान हल्ला प्रकरण- सुटकेसाठी आरोपीचा वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज
प्रोटोकॉलची ऐशीतैशी… निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांच्या मुलाचे नाव, अहिल्यानगरमध्ये महायुतीत पुन्हा धुसफूस
इंदूर ठरले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर, महिला बालकल्याण विभागाची माहिती
India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार
ओशिवरात शाळेच्या मैदानात बेकायदा मदरसा! उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य, अखेर सिडकोने दाखल केले प्रतिज्ञापत्र