India Pakistan War पाकिस्तानने केलेले तुर्कीच्या 400 ड्रोनचे हल्ले हाणून पाडले, प्रवासी विमानांची ढाल करून हल्ले
पाकिस्तानने गुरुवारच्या मध्यरात्री हवाई तळ, लष्करी तळ आणि नागरी वस्त्या अशा हिंदुस्थानातील 36 ठिकाणांना लक्ष्य केले. हवाई हद्दीत घुसखोरी करून तुर्की बनावटीच्या 300 ते 400 ड्रोनचा मारा करण्यात आला. हे ड्रोन हल्ले हिंदुस्थानने हाणून पाडले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तान प्रवासी विमानांची कशी ढाल करत आहे याचा पुरावाच कर्नल सोफिया यांनी यावेळी दाखवला.
ऑपरेशन सिंधूर नंतर सलग तिसऱ्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या हल्ल्यांबाबतची विस्तृत माहिती दिली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या. पाकिस्तानचा मुख्य उद्देश हिंदुस्थानच्या गुप्त आणि हवाई संरक्षण प्रणालीची माहिती घेणे होते. पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ले केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. हिंदुस्थानी लष्कराने ही सर्व ड्रोन्स पाडली. पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ अंदाधुंद गोळीबार केला. यात काही जवान जखमी झाले.
यूएव्हीद्वारे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा डाव
युएव्ही म्हणजेच अनमॅन एरीएयल व्हेईकलद्वारे पाकिस्तानने भटिंडा लष्करी तळ उद्ध्वस्तकरण्याचा डाव आखला होता. परंतु, त्यांचा हा डाव हाणून पाडल्याचे सोफिया कुरेशी यांनी सांगितले. पंजाब सेक्टरमध्ये हाय एयर डिफेन्स अलर्टदरम्यान आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, पाकिस्तानने या क्षेत्रात नागरी उड्डाण सुरू ठेवले. पाकिस्तानचे प्रवासी विमान दमम येथून उड्डाण घेऊन लाहोरपर्यंत गेले. यावेळी हिंदुस्थानच्या हवाई दलाने संयम बाळगला आणि त्यांचे प्रवासी विमान सुरक्षित राहील याची काळजी घेतली. प्रवासी विमानाच्या आडून त्यांनी लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा डाव हिंदुस्थानने हाणून पाडल्याचे कुरेशी म्हणाल्या.,
चर्चवरही हल्ला
पूंछ जिह्यात एका क्राइस्ट स्कूलजवळ पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा केला. त्यांच्या सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. क्राइस्ट स्कूलच्या काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी अंडरग्राऊंड हॉलमध्ये लपून जीव वाचवला. गुरुद्वारा आणि मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे मिसरी यांनी सांगितले.
युद्धासाठी उकसवले
पाकिस्तानने 8 मेच्या रात्री चिथावणीखोर आणि आक्रमक कृती करून युद्धासाठी उकसवले. हिंदुस्थानातील शहरे आणि नागरी पायाभूत सुविधा तसेच लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. परंतु, याला सशस्त्र दलांनी अतिशय संतुलित प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या हल्ल्यांची जबाबदारी नाकारणे हे त्यांच्या ढोंगीपणाचे आणि दुतोंडीपणाचे उदाहरण आहे, असे कर्नल कुरेशी म्हणाल्या.
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; चार हवाई ठिकाणांवर ड्रोन डागले
भटिंडा लष्करी तळावर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. तो उधळून लावतानाच चोख प्रत्युत्तर देत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या चार हवाई ठिकाणांवर ड्रोन डागले. त्यात एक एअर डिफेन्स रडार नष्ट करण्यात यश आले, असे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानने हिंदुस्थानला क्षेपणास्त्रs आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करताना आपले हवाई क्षेत्र बंद केले नाही. प्रवासी विमान वाहतूक सुरू ठेवली. प्रवासी विमानांचा त्यांनी ढालीसारखा वापर केला, असे सांगत सोफिया यांनी कराची-लाहोर हवाईमार्गाचे रडार चित्र दाखवले.
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न- मिसरी
पाकिस्तानी सैन्याने पूंछमधील गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्यांची जबाबदारी घेण्याऐवजी हिंदुस्थाननेच हा हल्ला केल्याचे सांगून पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहे. पाकिस्तानने नेहमीच प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List