“फडणवीस सक्षम नेतृत्व, मंत्र्यांचे खून पडले तरी…”, संजय राऊतांची घणाघाती टीका, मराठा-ओबीसी आरक्षणाचा संभ्रम दूर करण्याचे आवाहन
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारमधील नेतेही एकमेकांविरोधात विधाने करत असून दोन्ही समाजात कटुता निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी आत्महत्येसारखे दुर्दैवी प्रकारही घडले असून याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिकपणे टीका केली आहे. राज्यातले अंतर्गत, पक्षांतर्गत, युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत प्रश्न सोडवण्यात फडणवीस सक्षम आहेत, असे राऊत म्हणाले. तसेच या विषयावरून मंत्र्यांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही. कॅबिनेटमध्ये एक दिवस गँगवॉर होईल, असेही राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मराठा-ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. राज्यांतर्गत, पक्षांतर्गत, युती अंतर्गत आणि कॅबिनेट अंतर्गत प्रश्न सोडवण्यास फडणवीस सक्षम आहेत. उद्या या विषयावरून खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही. कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावरून गँगवॉर होईल. मी वारंवार हे सांगत असून यामुळे मला माओवादी ठरवत आहेत. कॅबिनेटमध्ये टोकाचा संघर्ष चालला आहे. छगन भुजबळ म्हणतात, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल. असे सांगणे सुद्धा माओवादच आहे. मग जनसुरक्षा कायद्याखाली भुजबळांवर कारवाई करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
काल मिंधे गटाचे लोक माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले. मी इतकेच म्हणालो की, महाराष्ट्रात पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढली असून सरकारने काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठले म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उलथवून टाकले. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातील भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. यात देशद्रोहाचा गुन्हा काय? असा सवाल राऊत यांनी केला. सरकारमध्ये मूर्ख लोक बसले आहेत किंवा मोदी, शहा यांनी घटनाबाह्य पद्धतीने मांडीवर बसवलेले लोक आहेत. हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात. यांना जनतेने मतदान केलेले नाही, अशी टीकाही राऊत यांनी मिंधे गटावर केली.
भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्याने संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
…तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ
आरक्षणाच्या विषयावरून लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. लातुरात आत्महत्या झाली तर इतर ठिकाणी धमक्या दिल्या जात आहेत. यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि मराठा, ओबीसी आरक्षण किंवा इतर प्रश्नावर सरकारच्या वतीने रोखठोक उत्तरे द्यावीत. जाता जाता मीडियासमोर बोलतात तसे करू नये. एवढा मोठा निर्णय घेतला, भूमिका घेतली, त्याच्यावर भविष्यात मतं मागणार आहात त्यावर पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या मनातील शंकांची उत्तरे द्या. पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ. पण मराठा, ओबीसी आरक्षणावर महाराष्ट्रात जो गोंधळ निर्माण झाला आहे त्या संदर्भात जनतेशी संवाद साधा. दोन उपमुख्यमंत्री, जरांगे पाटील, छगन भुजबळ यांनाही बोलवा आणि समोरासमोर सर्व होऊ द्या. तरच महाराष्ट्रात शांतता नांदेल, असेही राऊत म्हणाले.
भुजबळांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना नेपाळमध्ये नेऊन सोडा – जरांगे पाटील
मोदींसारखे घाबरू नका
आज प्रत्येक समाज अस्वस्थ, अशांत आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. मी नक्की कुठे आहे हे त्यांना कळत नाही. फडणवीस यांच्यासारखे सक्षम नेतृत्व असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संभ्रम दूर करावा. त्यांनी मोदींसारखे पत्रकार परिषदेला घाबरू नये. त्यांच्याकडे बहुमताचे सरकार आहे. मग त्यांनी या विषयावर बोलावे, असे आवाहन राऊत यांनी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List