दंड भरण्यासाठी गर्दी झाल्याने लोकअदालतीचा फज्जा
वाहनांवरील प्रलंबित दंडाच्या तडजोड शुल्कासाठी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचा फज्जा उडाला आहे. 10 ते 13 सप्टेंबर कालावधीत नियोजन केले. वाहतूक विभागाच्या विस्कळीत नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरदिवशी काहीजणांना टोकण देण्यात आले होते. प्रत्यक्षात दोन ते अडीच हजारांहून अधिक नागरिक वाहतूक विभागाच्या येरवडा मध्यवर्ती कार्यालयात आले होते. मात्र, त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालत शिबिर 10 सप्टेंबरला सुरू झाले. त्यासाठी वाहतूक विभागाने मोठी प्रसिद्धी केली. नागरिकांना वाहनांवरील प्रलंबित दंडाचे तडजोड शुल्क भरण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र वाहतूक विभागाने कोणतेही नियोजन केले नव्हते. शुक्रवारी (दि.12) अवघ्या 200 ते 300 जणांना टोकन दिल्याचे बोलले गेले. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित झालेल्या हजारो नागरिकांचा हिरमोड झाला. वाहनांवरील दंड कमी होणार या अपेक्षेने शेकडो नागरिक कागदपत्रांसह येरवडा वाहतूक विभागाजवळ दाखल झाले. मात्र, कार्यालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांना अडविण्यात आले. आजचा कोटा संपला आहे, तुम्ही उद्या या, असे सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
म्हणे आम्ही फक्त अंमलबजावणी करतो…
राष्ट्रीय लोकअदालत शिबिरात उपस्थित राहून वाहनांवरील दंड जमा करण्यासाठी वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले होते. मात्र, शेकडो नागरिक आल्याने कार्यालयातील नियोजन बारगळले. त्यानंतर वाहतूक उपायुक्तांनी हात वर केले. लोकअदालत ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. पोलिसांनी फक्त परिसर आणि लॉजिस्टिक उपलब्ध करून दिले आहे, असे वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, लोकअदालतीत गर्दीमुळे वाहतूक विभागाची नियोजन शून्यता दिसून आली. शुक्रवारी येरवडा मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाली होती.
जास्तीत जास्त ठिकाणे हवीत
नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचा प्रलंबित दंड आहे. संबंधित दंड भरण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत एकाच ठिकाणी मध्यवर्ती येरवडा वाहतूक विभागात आयोजित केल्यामुळे मोठी गर्दी झाली. त्यातच नेटवर्कची समस्या, गर्दी, गोंधळ, समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भविष्यात वाहतूक विभागाच्या पाच ते सहा ठिकाणांवर लोकअदालतीचे आयोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यासोबतच संबंधित शिबिराची मुदत दोन दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List