राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात 53 दिवसांनंतर प्रकटले धनखड
देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ 11 सप्टेंबर 2030 पर्यंत असणार आहे.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, जगदीप धनखड यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी जगदीप धनखड यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून धनखड कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. धनखड कुठे आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केला होता. आज तब्बल 53 दिवसांनंतर धनखड दिसले.
संघ स्वयंसेवक, महाराष्ट्राचे राज्यपाल ते उपराष्ट्रपती
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म तामीळनाडूतील तिरूप्पूर येथे 1957 रोजी झाला. बालपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. 1996 ला तामीळनाडू भाजप सचिव झाले. 1998 ला कोईम्बतूरचे लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. 2004 ते 2007 पर्यंत ते प्रदेशाध्यक्ष होते. 2023 ला तेलंगणाचे राज्यपाल झाले. 2024 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. आज राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List