एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा, वाहतूक बंद… पाडकामाला सुरुवात
सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा झाला आहे. या पुलावरील वाहतूक आज रात्रीपासून बंद करण्यात आली असून लगेचच पाडकामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, बाधित इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने रहिवाशांनी तूर्त आपले आंदोलन स्थगित केले आहे.
ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीए हे काम करणार आहे. या पाडकामाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असल्याने दोन वेळा पाडकाम पुढे ढकलावे लागले होते. मात्र गुरुवारी याबाबत आदेश काढण्यात आला आणि आजपासून लगेचच पाडकामाला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या प्रकल्पात 19 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांची पुनर्विकासाची मागणी आहे. यावरून रहिवाशी आक्रमक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रहिवाशांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तूर्त तणाव निवळला आहे.
पोलिसांच्या रहिवाशांना नोटिसा
पुलाच्या परिसरातील इमारतींमध्ये राहणाया नागरिकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. हे सरकारी काम असून विनाकारण त्यात कोणी अडथळा आणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करू नये. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाईल. आपले काही म्हणणे असल्यास ते सनदशीर मार्गाने शासनासमोर ठेवाव्यात असे त्या नोटिशीतून नागरिकांना सांगण्यात आले आहे.
पुनर्वसनाबाबत आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठक
मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर येत्या आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. क्लस्टर पुनर्विकासाची रहिवाशांची मागणी आहे. ती मान्य व्हायला हवी, असे शिवसेना आमदार महेश सावंत यांनी यावेळी सांगितले. रहिवाशांनीही मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार आठ दिवस आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून सरकारने शब्द फिरवल्यास काम बंद पाडले जाईल, असा इशारा दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List