आदेश जारी… पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी!
महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15,631 पोलिसांची मेगाभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भरतीमध्ये सन 2022पासून 2025पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी विशेष बाब म्हणून पोलीस भरतीसाठी असणारी वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश गृह विभागाने जारी केला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. ही पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 2024 ते 2025 या कालावधीत रिक्त होणाऱया 15 हजार 631 पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे.
भरण्यात येणारी पदसंख्या
- पोलीस शिपाई – 12,399
- पोलीस शिपाई चालक ः- 234
- बॅण्ड्स मॅन – 25
- सशस्त्र पोलीस शिपाई – 2393
- कारागृह शिपाई – 580
राज्याच्या पोलीस दलात 2024 व 2025मध्ये रिक्त होणाऱया पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे.
पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List