सामना अग्रलेख – ढगफुटींचे आक्रित!
जम्मू-कश्मीर, हिमाचल व उत्तराखंड यांसारख्या हिमालयाच्या पर्वतरांगांतील राज्यांतच घडणाऱ्या ढगफुटीच्या घटनांनी आता संपूर्ण देशाला कवेत घेतले आहे. मुळातच कमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यालाही आता ढगफुटीच्या घटनांचा व त्यामुळे होणाऱया अतोनात नुकसानीचा पुनः पुन्हा सामना करावा लागत आहे. निसर्गाचाही तोल बिघडत आहे. त्यामुळेच कोरडा व दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात ढगफुटींचे आक्रित वारंवार घडत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अडकून पडलेले सरकार या आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज आहे काय?
निसर्गाला हल्ली काय झालंय ते कळायला मार्ग नाही. एरवी केवळ हिमालयाच्या कुशीतील राज्यांमध्ये होणाऱ्या ढगफुटीच्या घटना आता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडू लागल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ हा तसा कोरड्या हवामानाचा व कमी पर्जन्यमानाचा प्रदेश. मात्र अलीकडच्या काळात या दोन्ही विभागांमध्ये ढगफुटी होऊन प्रचंड नुकसानीच्या घटना वारंवार घडत आहेत. ढगफुटी होऊन तास-दोन तासांमध्ये किंवा कधी कधी अवघ्या अर्ध्या तासात भयंकर अतिवृष्टी होते व काही मिनिटांत होत्याचे नव्हते करून टाकते. हा पाऊस इतका मुसळधार असतो की, ज्या गावांच्या आसपास ही ढगफुटी होते तेथील नदीनाले व ओढ्यांना अचानक मोठा पूर येतो व आसपासची सगळी शेत-शिवारे पाण्याखाली जातात. गेले दोन दिवस नांदेड व लातूर जिल्ह्यांनी अशाच अक्राळविक्राळ पावसाचा अनुभव घेतला. एकट्या नांदेड जिल्ह्यात गेले दोन दिवस तब्बल 86 मंडळांमध्ये ढगफुटी झाली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता नांदेड जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांवर गडद काळे ढग दाटून आले. नांदेडनजीक असलेल्या माळाकोळी येथे अवघ्या काही मिनिटांत 284 मि.मी. पावसाची नोंद झाली. नांदेड तालुक्यातील तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा, वाझेगाव या मंडळांतही सुमारे 270 मि.मी. पाऊस झाला. मागच्याच आठवड्यात मुखेड तालुक्यात ढगफुटी होऊन लेंडी धरणाचे पाणी अनेक गावांत शिरले होते. तशीच परिस्थिती
नांदेड जिल्ह्यावर
पुन्हा ओढवली. नांदेड शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीने विष्णुपुरी धरण तुडुंब भरले आहे. शिवाय जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी प्रकल्पात वेगाने पोहोचत असल्याने विष्णुपुरी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरीला आलेल्या पुराने काठावरील वस्त्यांना व नांदेडपुढील गोदाकाठच्या गावांना मोठाच धोका निर्माण झाला आहे. नांदेडपासून बाभळी धरण ते तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. शिवाय लेंडी व मानार प्रकल्पातून पुन्हा पाणी सोडण्यात आल्याने पंधार, लोहा, मुखेड या तालुक्यांतही हाहाकार उडाला आहे. गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. लातूर जिल्ह्यातही ढगफुटीसारख्या पावसाने तब्बल 65 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. मांजरा, तेरणा, तावरजा यासह सर्व लहानमोठ्या नद्या व ओढ्यांना मोठा पूर आला व हे पाणी आसपासच्या शेतांमध्ये घुसले. केवळ नदीलगतच्याच नव्हे, तर अन्य भागांतही शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. ढगफुटीचे हे संकट मराठवाड्यावर पुनः पुन्हा कोसळत आहे. 2021 मध्येही मराठवाड्यात तब्बल 42 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हादेखील लाखो हेक्टरवरील शेतातील
उभी पिके वाहून
किंवा सडून गेली होती. पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे ढगांची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे व वायुमंडळातील वाढत्या आर्द्रतेमुळे एखाद्या विशिष्ट भागात एकाच वेळी ढगफुटी होऊन मोठय़ा प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटना महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सातत्याने घडत आहेत. ढगफुटी व अतिवृष्टी या घटनांचा धोका 2030 पर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. पुढच्या पाच वर्षांत तर या घटनांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच जनतेलाही जागरूक राहावे लागणार आहे. एकटय़ा ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला तर जम्मू-कश्मीरातील किश्तवाडमध्ये ढगफुटी होऊन 48 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्हय़ात धाराली हे गावच ढगफुटीत वाहून गेले. अनेक घरे व बहुमजली हॉटेल्स पत्त्यासारखे कोसळली. पन्नासहून अधिक लोक बेपत्ता झाले. जम्मू-कश्मीर, हिमाचल व उत्तराखंड यासारख्या हिमालयाच्या पर्वतरांगांतील राज्यांतच घडणाऱया ढगफुटीच्या घटनांनी आता संपूर्ण देशाला कवेत घेतले आहे. मुळातच कमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाडय़ालाही आता ढगफुटीच्या घटनांचा व त्यामुळे होणाऱया अतोनात नुकसानीचा पुनः पुन्हा सामना करावा लागत आहे. निसर्गाचाही तोल बिघडत आहे. त्यामुळेच कोरडा व दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाडय़ात ढगफुटींचे आक्रित वारंवार घडत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अडकून पडलेले सरकार या आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज आहे काय?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List