केगाव प्रशिक्षण केंद्रातील 170 पोलिसांना विषबाधा
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱया सुमारे 170 पोलिसांना मंगळवारी (दि. 2) रात्री विषबाधा झाल्याने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सुमारे 1300 हून अधिक पोलीस प्रशिक्षणार्थी आहेत. मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर अनेकजणांना उलटी-जुलाब, मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्रास होत असलेल्या 170 जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती स्थिर असून, 15 ते 20 जणांना सलाईन लावण्यात आल्या आहेत. विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, याबाबतचा अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मेसमध्ये विद्यार्थी व अधिकारी भोजन घेत असतात. तेथील अन्नाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अनेक प्रशिक्षणार्थी पोलीस विषबाधा झाल्याने उपचारासाठी दाखल झाल्याचे कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सध्या शासकीय रुग्णालयात दाखल 88 प्रशिक्षिणार्थी पैकी 79 जणांना उपचार करून पाठविण्यात आले आहे. तर, 9 जण उपचारासाठी दाखल आहेत. जिल्हा रुग्णालयात 84 प्रशिक्षणार्थींपैकी 30 जणांवर उपचार करून पाठविण्यात आले. 54 जणांवर उपचार सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List