दक्षिण कोरियाने हिंदुस्थानला झुंजवले, थरारक संघर्षानंतर हिंदुस्थानने 2-2 बरोबरी साधली
साखळीत महाविजय नोंदवणाऱया हिंदुस्थान आणि दक्षिण कोरियाला आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत संघर्षमय बरोबरी साधता आली. हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना रोमांचक वळणावर येऊन 2-2 अशा अनिर्णित निकालावर थांबला. मनदीप सिंहच्या पेनल्टी कॉर्नरने गोल ठोकत हिंदुस्थानला बरोबरी साधून दिली. पावसामुळे काहीसा उशिरा सुरू झालेल्या या सामन्याने प्रेक्षकांना शेवटच्या मिनिटापर्यंत श्वास रोखून धरायला लावले.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला हार्दिक सिंहने अचूक फिल्ड गोल करीत हिंदुस्थानला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. परंतु कोरियाने सडतोड उत्तर देत 12व्या मिनिटाला यांग जिहुनच्या पेनल्टी स्ट्रोकवर बरोबरी साधली आणि मग त्यानेच 14व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अवघ्या दोन मिनिटांत दक्षिण कोरियाच्या बाजूने झुकवला. पहिल्या सत्रात कोरियाने 2-1 अशी आघाडी घेत यजमानांवर दबाव वाढवला.
यानंतर दुसऱया व तिसऱया सत्रात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला, मात्र गोलफलक बदलला नाही. अखेर निर्णायक चौथ्या सत्रात 52व्या मिनिटाला मनदीप सिंहने अप्रतिम गोल करीत हिंदुस्थानला बरोबरी साधून दिली. या गोलने मैदानात एकच जल्लोष उसळला.
उर्वरित वेळेत दोन्ही संघांनी विजयासाठी प्राणपणाने झुंज दिली, पण कसलेल्या बचावामुळे आणखी गोल नोंदवले गेले नाहीत. परिणामी सामना 2-2 ने अनिर्णित राहिला. या बरोबरीमुळे सुपर-4 मधील स्थिती अधिक चुरशीची झाली असून फायनल गाठण्यासाठी हिंदुस्थानच्या आशा अद्याप कायम आहेत. पुढील सामन्यात विजय मिळवणे संघासाठी निर्णायक ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List