कोणीही शंका घेऊ नका, तीळमात्रही नको, कोणाही विदूषकाचे, अविचारी माणसाचे ऐकू नका, सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार – जरांगे
मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आज मराठा बांधवांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. जीआरबद्दल तीळमात्रही शंका घेऊ नका, कोणाही विदूषकाचं, अविचारी माणसाचं ऐकून गैरसमज नको, सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार, असे त्यांनी सांगितले.
सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर पाच दिवसांनी मनोज जरांगे यांनी मंगळवारी आपले उपोषण संपवले. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिथूनच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहे, असे सांगत जरांगे यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला समाज बांधवांना दिला.
‘‘मराठय़ांनी जिवाची बाजी लावली. या लढय़ाला जे यश मिळालं ते सगळं यश माझ्या मराठा बांधवांचं आहे, मी नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार. अनेकांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेटिअर लागू करायचे आहे. त्याचा जीआर निघणं खूप आवश्यक होतं,’’ असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण विरोधकांवरही जरांगे यांनी या वेळी निशाणा साधला. ते म्हणाले की, काहींचं पोट दुखत होतं. कारण त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, जीवन पूर्ण जगत होते, ते पूर्ण कोलमडायला आलं आहे. ज्याच्या जिवावर राजकारण करायचे होते तेच त्यांच्या हातून गेलं आहे.
मला तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न आहे
मराठा बांधवांमध्ये आणि आपल्यात दरी निर्माण करून एकमेकांपासून तोडायचा विरोधकांचा उद्देश आहे, असा आरोपही या वेळी जरांगे यांनी केला. गरीब मराठय़ांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका, समाजाचे वाटोळे करण्यासाठी आपण एवढे केलेले नाही, माझ्यावरील तुमचा विश्वास ढळू देऊ नका, अशी विनंतीही जरांगे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List