डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
एकीकडे डोंबिवलीत जमिनीचे भाव गगनाला भिडले असतानाच पु. भा. भावे सभागृहातील तलाठी कार्यालय भूमाफियांनी फोडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चोरट्यांनी कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोबारा करताना नवे टाळे ठोकले. पोलिसांनी या माफियांचा शोध सुरू केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या चोरीप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी तलाठी व मंडल कार्यालय सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. कार्यालय बंद करून कर्मचारी घरी परतले. त्यानंतर दोन दिवस सुट्टी असल्याने शनिवारी-रविवारी कार्यालय उघडले गेले नाही. या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र जाताना त्याने कार्यालयाला नवीन कुलूप लावल्याचे सकाळी आढळले. चोरांनी महत्त्वाची कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतरच कोणती कागदपत्रे चोरीस गेली आहेत का, याबाबत निश्चित माहिती मिळेल, असे तलाठी जमदरे यांनी सांगितले.
जमिनीच्या वादामुळे चोरांचे फावले
कल्याण-डोंबिवली परिसरात जमिनीसंबंधी वाद वारंवार घडत असतात. भूमाफिया, मूळ मालक व विकासक यांच्यातील वादांमुळे महसुली कागदपत्रांना मोठे महत्त्व असते. या कागदपत्रांच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करून मोठ्या व्यवहारांना खतपाणी घालण्याचे प्रयत्न अनेकदा होत आहेत. विष्णूनगर पोलीस तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List