नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नवी मुंबईच्या घराघरातून आणि महाराष्ट्राच्या गावागावातून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आलेली विक्रमी शिदोरी मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिली आहे. हे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ आता बीड येथील नारायण गडावर पाठवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभरातून आलेल्या हजारो आंदोलकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था नवी मुंबईत करण्यात आली होती. सर्वाधिक आंदोलक वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मुक्कामाला होते. या आंदोलकांसाठी नवी मुंबईच्या घराघरातून चटणी-भाकरी पाठविण्यात आल्या. अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य आणि सकाळी नाश्त्याचे पदार्थ पाठवले. राज्यभरातील गावागावातून अन्नधान्याचे आणि पाण्याच्या बाटल्यांचे टेम्पो सिडको एक्झिबिशन सेंटर आणि अन्य मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी अन्नधान्याचे ढीगच्या ढीग लागले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यानंतर सर्वच आंदोलकांनी त्याच रात्री आपला मुक्काम हलवला.
राज्याच्या गावागावातून आंदोल कांसाठी आलेली शिदोरी मात्र मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिली. ही उरलेली काही शिदोरी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर पाठवण्यात येणार आहे, तर काही खाद्यपदार्थांचे महापालिकेच्या सफाई कामगारांना वाटप करण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List