आभाळमाया – वेरा रुबिन
>> वैश्विक
आधी नामकरण झालं होतं ‘लार्ज सायनॉप्टिक सर्व्हे टेलिस्कोप.’ त्याचा अर्थ व्यापक प्रतिमा घेऊ शकणारी अशी अवकाशाकडे रोखलेली महाकाय दुर्बिण. ग्रीक भाषेतील सिन (Syn) म्हणजे एकत्र आणि ‘आपिस’ म्हणजे देखावा (ह्यू) या दोन शब्दांच्या जुळणीतून ‘सायनॉप्टिक’ हा शब्द तयार झाला. तसेही आजकाल ‘एकोप्याने’ काम करण्याला ‘सिनर्जी’ हा शब्द वापरतातच. असे अर्थवाही शब्द अनेक ‘ऍस्ट्रोप्रोब’साठी शोधले जातात. आपल्याकडचेच काही अर्थवाही चपखल शब्द आपण विसरत चाललो आहोत. विज्ञान विचार जनसामान्यांच्या आवडीचा करायचा असेल तर अगदी बोलीभाषेतले शब्दही जिथे अर्थवाही असतील, तिथे आणले पाहिजेत.
आजचा विषय तो नाही. कारण एव्हाना तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ‘सायनॉप्टिक’सारखा छान शब्द नावात असताना चिली देशातल्या त्या महादुर्बिणीचे नाव बदलून ‘वेरा रुबिन’ टेलिस्कोप असे का ठेवले? म्हणूनच आपण या लेखात या महान महिला संशोधिकेची माहिती घेऊ या.
आता जाणून घेऊ या की, वेरा फ्लॉरेन्स कुपर रुबिन या अंतराळ संशोधिकेने दीर्घिकांच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीचा (रोटेशनचा) कालावधी कसा ठरवला आणि खगोलविश्वातील एका मोठय़ा प्रश्नाचं उत्तर कसं मिळवलं. इथे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं की, 23 जुलै 1928 रोजी जन्मलेल्या वेरा फ्लॉरेन्स कुपर यांना सुरुवातीच्या काळात कितीतरी वर्षे आजच्या सारखी आधुनिक साधने उपलब्ध नव्हती, परंतु मनातली जिद्द अफाट होती. कोणत्याही क्षेत्रांत महिलांना अगदी युरोप, अमेरिकेतही फारसा स्कोप नसणाऱया काळात तरुण वेराने थेट टेलिस्कोपचाच ध्यास घ्यावा ही विशेष गोष्ट होती. अमेरिकेतल्या पॅनसिल्वेनिया राज्यातील फिलॅडेल्फिया येथे त्यांचा जन्म झाला. पुढे कॉर्नेल आणि जॉर्जटाऊन विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतलं.
त्याच सुमारास त्यांचा रॉबर्ट रुबिन यांच्याशी विवाह झाला. रुबिन यांच्या खगोल संशोधनाचे दोन मुख्य भाग होते. दीर्घिकांचं स्वतःभोवती फिरणं (रोटेशन) आणि विश्वातील ‘डार्क मॅटर’ किंवा कृष्णद्रव. दुसऱया विषयाचा अभ्यास त्यांनी फोर्ड यांच्यासह केला. त्यांना त्यांच्या संशोधनासाठी ‘रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’च्या सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मात्र त्या काळातील महत्त्वाचं खगोलीय संशोधन असूनही भौतिकशास्त्र्ााचं ‘नोबेल’ त्यांच्या वाटय़ाला आलं नाही. तेव्हा त्याबाबतीत त्या महिला असल्याने असं घडलं का अशीसुद्धा शंका उपस्थित केली गेली. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने मात्र त्यांचा ‘कोपर्निकससारखा बदल दर्शविणाऱया संशोधक’ असा यथार्थ गौरव केला.
बालपणीचा काळ न्यूयॉर्क राज्यात घालविल्यावर दहाव्या वर्षीच वेरा यांचं कुटुंब वॉश्गिंटन डी. सी. येथे आलं. हे राजधानीचं शहर होतं, परंतु त्या काळातल्या वॉश्गिंटनमधल्या घराच्या खिडकीतूनही रात्रीच्या निरभ्र आकाशातल्या खच्चून भरलेल्या तारका पाहण्याची ‘सोय’ होती. जगातलं अफाट, गच्च गर्दीचं शहरीकरण तेव्हापर्यंत झालेलं नव्हतं. मुंबईतूनही 1960 च्या दशकात रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक तारे, नक्षत्रांची जत्रा दिसायची.
या आकाशीची ‘दौलत’ पाहण्याच्या छंदातून छोटय़ा वेराच्या मनात खगोलशास्त्र्ााची आवड निर्माण झाली. 13 वर्षांची वेरा दूरस्थ ताऱयांचा म्हणजे पर्यायाने विश्वाचाच विचार करू लागली. त्यांनी नंतर म्हटलंय की, ‘मला अवकाशाबद्दल प्रश्न पडत आणि उत्तरांपेक्षा मनात येणाऱया प्रश्नांमध्येच जास्त रस होता.’ असे प्रश्न पडले तरच चिकित्सा संभवते आणि त्यातूनच योग्य उत्तरं मिळून संशोधन होत असतं. अर्थात प्रश्न जेव्हा अर्थपूर्ण असतात, तेव्हाच उत्तरंही अर्थपूर्ण ठरतात.
अशा अदम्य जिज्ञासेतून बाल वेराने एका कार्डबोर्डचं नळकांड करून अगदीच साधी दुर्बिणही बनवली. त्यात तिला तिच्या इंजिनीअर वडिलांची मदत झाली. मात्र शाळेत वगैरे तिला ‘आर्टिस’ होण्याचा सल्ला दिला जायचा. 1944 मध्ये शालेय शिक्षण झाल्यावर वेराने वेस्सार कॉलेजात प्रवेश घेतला. त्यामागचं कारण म्हणजे ते केवळ मुलींचं कॉलेज होतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याच कॉलेजात एकेकाळी 1847 मध्ये धूमकेतू शोधणाऱया मारिया मिशेल यांनी एक वेधशाळाही 1865 मध्ये स्थापन केली होती. या सुखद वातावरणात वेरा 1948 मध्ये खगोलशास्त्राच्या पदवीधर झाल्या. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठात केवळ ‘मुलगी’ म्हणून त्यांना खगोल अभ्यासासाठी नकार मिळाला, पण हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेता आला, तोसुद्धा ती कॉर्नेल विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याबरोबर विवाह करणार म्हणून नाकारला गेला.
अशा अनेक समस्यांचा सामना करत वेरा कॉर्नेल विद्यापीठातल्या खगोल अभ्यासक मार्था कार्पेंटर यांच्याकडे दीर्घिकांचा अभ्यास करू लागल्या. तिथेच त्यांना दीर्घिकाही त्यांच्या ‘अक्षा’भोवती फिरतात हे संशोधनातून समजलं. यावर बराच वाद झाला, परंतु अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीत वेरा यांना सादरीकरणाची संधी मिळाली. 1950 मध्ये त्यांच्या संशोधनाला वृत्तपत्रीय प्रसिद्धी लाभली. तेव्हा त्या नुकत्याच एका बाळाची आई झाल्या होत्या. त्यावरून ‘तरुण मातेने विश्वरचना सिद्धांत शोधला’ असे कौतुकही झाले आणि 2025 मध्ये म्हणजे यंदाच त्यांना एक चतुर्थांश डॉलरच्या नाण्यावर स्थान लाभलं. मात्र खगोलशास्त्रात त्यांनी त्यांची ‘मुद्रा’ आधीच उमटवली होती!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List