सामना अग्रलेख – इतरांनाही माता आहेत! मोदींच्या भारतमातेचा अपमान कोणी केला?
गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय महिला, संस्कृती व परंपरांचा जितका अपमान केला तेवढा कोणत्याही पंतप्रधानाने केला नसेल. भारतमातेच्या इभ्रतीचे ‘लचके’ तोडणाऱ्या चिनी पंतप्रधानांचा पाहुणचार घेऊन मोदी भारतात परतले व इथे भारतमातेच्या नावाने छाती बडवू लागले. पंतप्रधान मोदी यांच्या रडगाण्याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. ‘व्होट अधिकार’ यात्रेत भाजपने स्वतःचेच लोक घुसवून ‘आयाबहिणीं’चा उद्धार करवून घेतला असावा. हीच शक्यता सगळ्यात जास्त आहे. मोदी पंतप्रधानपदी रडत रडत इतरांना शिव्या देत आले व तसेच रडत शिव्या देत परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र या काळात देशाची संस्कृती नष्ट झाली त्याचे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला विश्वगुरू समजतात, पण त्यांचे वर्तन त्या पदास शोभेल असे कधीच नसते. मोदी नुकतेच जपान, चीनचा मोठा दौरा आटोपून मायदेशी परतले. परदेशातील त्यांचे ‘खदाखदा’ हसणारे फोटो प्रसिद्ध झाले, पण भारतात मोदी उतरले ते रडक्या चेहऱ्याने. त्यांना रडायला कोणतेही कारण लागते. बिहारात राहुल गांधींच्या ‘व्होट अधिकार’ यात्रेत कोणीतरी, कुठेतरी मोदी यांना ‘आई’वरून अपशब्द वापरल्याचा कावा त्यांनी सुरू केला व ते रडू लागले. मोदी यांचे म्हणणे आहे की, ‘‘हा देशातील आई-बहिणींचा अपमान आहे.’’ प्रकरण इतके पुढे गेले की, भाजपच्या लोकांनी या विषयावर 4 सप्टेंबरला ‘बिहार बंद’चा पुकार केला. या ‘बिहार बंद’मध्ये सध्या पूर्ण राजकीय कोमात गेलेल्या नितीश कुमारांचा ‘जदयू’ पक्षही सामील झाला. मोदी यांच्या माताजी दिवंगत झाल्या आहेत. भारतात माता-भगिनींचा सदैव मान-सन्मान ठेवण्याची परंपरा आहे. मोदी यांची आईच नव्हे, तर कोणत्याही मायभगिनींचा अपशब्द वापरून कोणी उद्धार केला असेल तर त्याचा तीक्र शब्दांत धिक्कार करायलाच हवा. मग त्या पंतप्रधानांच्या मायभगिनी असोत नाहीतर सामान्य महिला असोत. याविषयी आपल्या देशात कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. द्रौपदीच्या अपमानातून या देशात महाभारत घडले आणि सीतामाईमुळे रामायणात संघर्ष झाला. त्यामुळे पंतप्रधानांच्या आईबाबत कोणी अपशब्द काढले असतील (खरोखरच तसे घडले असेल तर आम्हीसुद्धा निषेध करतो) तर ते चुकीचे आहे, पण अशा प्रकारची घटना खरोखरच घडली आहे काय? स्वतः राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या तोंडून असे अपशब्द कोठे निघाल्याचे कोणी पाहिले नाही व ऐकले नाही. यात्रेदरम्यान
जागोजाग सभा
झाल्या. त्या सभांतूनही कोणी मोदी यांच्या मातेसंदर्भात अपशब्द वापरले नाहीत. मोदी हे ‘व्होट चोर’ आहेत व त्या ‘व्होट चोरी’मुळे लोकशाही आणि भारतमातेची पूर्ण विटंबना झाल्याचे सगळय़ांनीच म्हटले. राहुल गांधी यांच्या बिहारमधील ‘व्होट अधिकार’ यात्रेत प्रचंड गर्दी होती. त्या यात्रेत तिरंगा हाती घेतलेल्या काही जणांनी अपशब्द वापरले असा कांगावा भाजपवाले करीत आहेत. गर्दीत असे स्वतःचेच हवशे, नवशे, गवशे घुसवून वातावरण बिघडवायचे हे धंदे भाजपने यापूर्वी केले आहेत. त्यामुळे हाती तिरंगा घेतलेल्या काही लोकांनी कोणाच्या मायभगिनींचा उद्धार केला असेल तर त्यास सर्वस्वी भाजपचेच लोक जबाबदार आहेत. या प्रकरणात आता स्वतः पंतप्रधान रडक्या चेहऱ्याने अश्रू ढाळत घुसले व राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करू लागले. मोदी म्हणतात, ‘‘आपल्या मातेबाबत वापरलेली भाषा म्हणजे बिहारच्या मायभगिनींचा अपमान आहे व बिहारच्या प्रत्येक सुपुत्राने या अपमानाचा बदला घ्यावा.’’ मोदी यांनी असेही जाहीर केले की, ‘त्यांच्या आईबाबत कोणी काही बोलले तर संपूर्ण भारतमातेचा अपमान आहे आणि भारतमातेचा अपमान आम्ही सहन करणार नाही.’ बिहारमधील पराभवाच्या भयाने मोदी यांनी ही रडारड करावी याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण मोदी हे असेच आहेत. मोदी यांची आई भारतमाता असेल तर देशातील प्रत्येक ‘आई’ भारतमाताच आहे व या भारतमातांचा अपमान रोजच होत आहे. मोदी यांनी या भारतमातांसाठी कधी छाती पिटून घेतली काय? मणिपुरात महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. एका जवानाच्या पत्नीचे वस्त्रहरण करून तिला रस्त्यावर फिरवले. तेव्हा मोदी यांना महिलांच्या सन्मानाची, भारतमातेच्या
अपमानाची आठवण
आली नाही. काँगेसचे एक प्रवत्ते सुरेंद्र रजपूत यांना टीव्हीवरील चर्चेत भाजप प्रवक्त्याने ‘आई’वरून अत्यंत घाणेरड्या शब्दांत शिव्या दिल्या. आम्हाला ते शब्द वापरायला व लिहायला लाज वाटते, पण ‘तेरी मां रंडी है’ या भाषेचा वापर भाजप प्रवक्त्याने करूनही मोदी व त्यांच्या भाजपचे मातृप्रेम उफाळून आले नाही. त्या अपशब्दाबद्दल कोणी माफी मागितल्याचे दिसत नाही. सोनिया गांधी यांना ‘काँग्रेस की विधवा’, ‘जर्सी गाय’ असे कोण बोलले होते हे जरा मोदी यांनी आठवून पाहावे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु त्यातून एवढ्या अश्लाघ्य शब्दांत व्यक्तिगत टीका करणे कोणत्या नैतिकतेत बसते, हे मोदी सांगतील का? शशी थरूर यांच्या पत्नीलादेखील ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ असे मोदी जाहीरपणे बोलले होते. आज तेच मोदी महिला सन्मानावर नक्राश्रू ढाळत आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय महिला, संस्कृती व परंपरांचा जितका अपमान केला तेवढा कोणत्याही पंतप्रधानाने केला नसेल. महिलांचे चारित्र्यहनन तर केलेच, पण इतरांचे चारित्र्यहनन करण्यासाठी महिलांचा वापर करणारे मोदी हे देशातले पहिले व शेवटचे पंतप्रधान ठरावेत. भारतमातेच्या इभ्रतीचे ‘लचके’ तोडणाऱ्या चिनी पंतप्रधानांचा पाहुणचार घेऊन मोदी भारतात परतले व इथे भारतमातेच्या नावाने छाती बडवू लागले. पंतप्रधान मोदी यांच्या रडगाण्याकडे देश आता गांभीर्याने पाहत नाही. ‘व्होट अधिकार’ यात्रेत भाजपने स्वतःचेच लोक घुसवून ‘आयाबहिणीं’चा उद्धार करवून घेतला असावा. हीच शक्यता सगळय़ात जास्त आहे. मोदी पंतप्रधानपदी रडत रडत इतरांना शिव्या देत आले व तसेच रडत शिव्या देत परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र या काळात देशाची संस्कृती नष्ट झाली त्याचे काय?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List