धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलटी मारल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा परिसरात मंगळवारी रात्री घडली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार ही मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात होती. याप्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रियाज हासियतील, आसादुला अली आणि अफजल बैतुलहा हे तिघे मंळवारी रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होते. त्यांची कार कसारा परिसरात आली असता एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. अवघड वळण आणि तीव्र उतार असल्यामुळे कारने तीन पलटी मारल्या. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
तिघांनाही खर्डी आणि कसारा येथील शासकीय रुग्णालयात नेले असता दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही हे उत्तर प्रदेशमधील होते. याप्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.
ट्रेलरवर टेम्पो धडकला; एक ठार
भरधाव टेम्पो पुढे चाललेल्या ट्रेलरवर धडकून झालेल्या अपघातात टेम्पोचालक जागीच ठार झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे घडली. अपघातग्रस्त टेम्पो हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. खालापूर परिसरात आल्यानंतर हा टेम्पो समोर चाललेल्या ट्रेलरवर जोरदार धडकला. या अपघातात टेम्पो ट्रेलरच्या चाकात जाऊन अडकला. टोल कंपनीच्या देवदूत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोचालकाचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List