रियाल नोटांच्या नावाखाली साबणाच्या वड्या देऊन फसवले, लायटर विक्री करणाऱ्याचे सवा लाख घेऊन दोघे पसार
सौदी अरब देशाच्या रियाल नोटांच्या ऐवजी साबणाच्या वड्या देऊन दोघा अनोळखी व्यक्तींनी लायटर विक्री करणाऱ्या तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
विकास शर्मा (29) असे फसवणूक झालेल्या लायटर विक्री करणाऱया तरुणाचे नाव आहे. परळच्या गौरीशंकर मिठाईवाला दुकानाजवळील पान टपरीवर लायटर विक्रीसाठी गेला असता तेथे त्याची एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीने विकासला सौदी अरब देशाची एक रियाल नोट दाखवून त्याचा फोन नंबर त्याला दिला. तसेच माझ्याकडे अजून रियाल नोटा असून त्या हिंदुस्थानी चलनामध्ये बदलून घ्यायच्या असल्याचे सांगितले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोघांमध्ये पुन्हा फोनवरून संपर्क झाला. तेव्हा एलफिन्स्टन ब्रिजखाली भेटायचे ठरले. त्यानुसार दोघे तेथे भेटले. मग ती अनोळखी व्यक्ती विकासला घेऊन माहीम येथील मोरी रोड परिसरात गेला. तेथे पोहचल्यानंतर त्या व्यक्तीने फोन करून एका महिलेला तेथे बोलावून घेतले. ती महिला तेथे आली व तिने बॅगेतून रियाल नोट आणल्याचे भासवले. मग महिलेसोबत असलेल्या व्यक्तीने 100 रियाल नोट देणार असल्याचे सांगत विकासला बोलण्यात गुंतवले व त्याकडे हिंदुस्थानी चलनाची मागणी केली. त्याप्रमाणे विकासने त्याच्याकडे एक लाख 11 हजार रुपये दिले.
पुढे जाऊन बघा…
पैसे मिळाल्यानंतर महिलेने तिच्याकडील बॅग विकासच्या स्कुटीवर ठेवली व पुढे जाऊन उघडून बघ असे सांगितले. त्यानुसार विकासने पुढे जाऊन बॅग उघडून पाहिली असता त्यात कागदात गुंडाळलेल्या साबणाच्या वडय़ा आढळून आल्या. त्यामुळे तो परत मागे आल्यावर ते दोघेही तेथून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. रियाल नोटांच्या बदल्यात आपल्याला साबणाच्या वडय़ा देऊन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विकासने दादर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List