विसर्जन घाटावर गणेशभक्तांची लुटमार, ठाणे पालिकेने नेमलेल्या ठेकेदारांची माणसे करतायत पैशांची मागणी
महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी सर्व प्रभाग समित्यांतर्गत कृत्रिम तलावांसह विविध ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे, पण प्रत्यक्षात विसर्जन घाटावर गणेशभक्तांची लूट केली जात असल्याचे उघड झाले आहे. पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराची माणसे गणेशभक्तांकडे पैशांची मागणी करत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्तकनगरमधील विभागप्रमुख प्रशांत सातपुते यांनी केला आहे.
ठाणे पालिकेने 15 ठिकाणी फिरती विसर्जन व्यवस्था उभारली आहे, तर सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तीसाठी कोपरी, पारसिक रेतीबंदर, राणानगर, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकुम व अन्य ठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठेकेदारांनी प्रत्यक्ष गणपती विसर्जन करण्याकरिता कर्मचारी नियुक्त केले असून ते गणेशभक्तांकडून तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतच्या पैशांची मागणी करत असल्याचे विभागप्रमुख प्रशांत सातपुते व शिवसैनिक महेश आरोळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
स्वखुशीने रक्कम देऊनही मनमानी
गणपती विसर्जन करताना पाट रिकामा राहू नये या भावनेतून अनेक गणेशभक्त स्वखुशीने घाटावरील ठेकेदारांच्या माणसांना पैसे देतात, पण ही माणसे मनमानीपणे अवाचे सवा पैशांची मागणी करत असल्याचा आरोप प्रशांत सातपुते यांनी केला आहे. विसर्जनाची व्यवस्था महापालिकेने मोफत केली असली तरी उपवन व रायलादेवी येथील घाटांवर ही लूटमार होत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List