पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
विरार महापालिका हद्दीत रमाबाई अपार्टमेंट इमारतीच्या दुर्घटनेनंतर पालघरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघरमध्ये सध्याच्या घडीला 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा आहे. या इमारतींना नोटीस दिल्यानंतरही त्या रिकाम्या केल्या जात नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. दरम्यान, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काही तास आधी वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेली रमाबाई अपार्टमेंट इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे, पालघरमधील धोकादायक इमारती चर्चेचा मुद्दा ठरल्या आहेत. पालघरमध्ये 49 इमारती धोकादायक यादीत आहेत. यामध्ये गुजराती शाळा, फैजमल चाळ, नंदभुवन अपार्टमेंट, बीएसएनएल इमारत, टेलिफोन एक्स्चेंज, शेरबानू अपार्टमेंट, बृजवासी हॉटेल, कौशिक मिश्रा यांची इमारत व जिल्हा परिषदेची शाळा यांचा समावेश आहे.
प्रशासनाने कानाडोळा करू नये
शैक्षणिक, व्यावसायिक व सरकारी इमारतींना जास्त धोका आहे. रेल्वे स्थानकासमोर पालघर नगर परिषदेची इमारत जीर्ण व धोकादायक आहे. कार्यालयीन वापरासाठी ती बंद असली तरी तळमजल्यावर अजूनही दुकाने सुरू आहेत. येथे मोठी बाजारपेठ असून एखादी दुर्घटना घडल्यास दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे कानाडोळा करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List