सोने व्यापाऱ्याने महिलेला दोन कोटींना फसविले
सोने व्यवसायाच्या व्यवहारातून केडगाव परिसरात राहणाऱ्या महिलेची सोने व्यापाऱ्याने 1 कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पैशांची मागणी केल्यावर महिलेसह तिच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमेश दिलीप पोरवाल, प्रतीक्षा दिलीप पोरवाल, अनिता दिलीप पोरवाल, मुन्ना खंडेलवाल, यश साखरिया, सांची साखरिया, शुभम खंडेलवाल व हिमेश पोरवाल याची आत्या (नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरेपींची नावे आहेत.
सन 2020 मध्ये दिवंगत सोनार दिलीप पोरवाल यांचा मुलगा हिमेश पोरवाल याच्याशी फिर्यादीची ओळख झाली. सोन्याचे व्यवहार, मुंबईतील अडकलेले सोने सोडवण्यासाठी आर्थिक मदत या बहाण्याने हिमेशने फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी रोकड तसेच गहाण ठेवलेले दागिने मिळून एकूण 1 कोटी 90 लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, व्यवहार न पूर्ण करता संशयित आरोपी गायब झाले. दरम्यान, फिर्यादीने पैसे व दागिन्यांची मागणी करण्यासाठी 6 जुलै रोजी संशयित आरोपींच्या घरी भेट दिली असता हिमेश पोरवाल व कुटुंबीयांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मुलीवर हल्ला केला. तसेच पोलीस आमचे काही वाकडे करू शकत नाहीत, अशी धमकी दिली. हल्ल्यानंतर फिर्यादीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List