दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर मोदी जाणार, दौऱ्यापूर्वी मुख्य सचिवांनी घेतल्या दोन बैठका; मदत शिबिरांना भेटी देणार
गेल्या दोन वर्षांपासून कुकी आणि मैतेई संघर्षामुळे धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये पाय ठेवण्यासाठी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळाला आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी मोदी मणिपूर आणि मिझोरामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत गोयल यांनी दोन विशेष बैठका घेतल्या आणि सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. दरम्यान, दौऱ्यादरम्यान मणिपूरमधील विविध मदत शिबिरांमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्याही मोदी भेटी घेणार असल्याची माहिती आयझॉलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय तयारी करण्यात आली आहे, याचाही मणिपूरच्या मुख्य सचिवांनी आढावा घेतला. मुख्य सचिवांनी दोन ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या खास सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. मणिपूरची राजधानी इंफाळ आणि कांगला तसेच चुराचांदपूर येथील पीस ग्राऊंडपर्यंत जाणाऱ्या व्हीव्हीआयपी मार्गावर जॅमर लावण्यात आले आहेत. सॅनिटायझेशन तसेच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुकी आणि मैतेईंमध्ये पुन्हा संघर्ष उभा राहू नये यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या माध्यमातून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
खूप उशीर झाला ः काँग्रेस
मोदी हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा करणार आहेत, परंतु त्यासाठी आता खूप उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरून दिली आहे. 2023 मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला. त्याच्या 15 महिनेआधी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना मतदारांनी कौल दिला, परंतु त्यानंतरही डबल इंजिन सरकारने रचलेल्या षडयंत्रामुळे आणि कटकारस्थानांमुळे या सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. हिंसाचारात शेकडो लोकांचे बळी गेले, हजारो लोक स्थलांतरित झाले. हजारो लोकांना मदत शिबिरांमध्ये राहावे लागत आहे. सगळीकडे भीतीचे वातावरण आहे, तरीही पंतप्रधान मूग गिळून बसले आहेत. उच्च न्यायालय म्हणाले होते की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तरीही मोदी गप्प आहेत, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
सुपर प्रोटेक्शन ग्रुपकडून सुरक्षा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर मंत्री आणि व्हीव्हीआयपींसाठी विविध मार्गांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुपर प्रोटेक्शन ग्रुपकडून सल्लामसलत करण्यात आली. त्यानुसार द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. यात व्यू कटर, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनच्या माध्यमातून देखरेख, बुलेटप्रूफ वाहने आणि डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी इंफाळच्या तुलिहाल विमानतळाजवळ एक खास व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. हा मार्ग खास प्रकारच्या फुलांनी सजवण्यात येणार आहे. त्याचबरोबर विमानतळापासून आयोजन स्थळ तसेच सभास्थळापर्यंत जाणारे मार्गही फुलांनी सजविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List