पावसाच्या सरी झेलत कोल्हापुरात घरगुती गणेश विसर्जन; मूर्तिदानाला संमिश्र प्रतिसाद, बॅरिकेड्स काढून पंचगंगेत मूर्ती विसर्जन
कोल्हापूरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कोसळणाऱ्या पावसाच्या सरी झेलत अन् ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात मोठय़ा भक्तिमय वातावरणात कोल्हापूरकरांनी सात दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शहरात दिवसभरात दहा हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. मूर्तिदान आणि निर्माल्यदान उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीच्या पार्श्वभूमीवर पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनास बंदी असल्याने घाटावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पण सकाळीच काही गणेशभक्तांनी हे बॅरिकेड्स काढून थेट नदीत गणेशाचे विसर्जन केले. घाटावर कृत्रिम कुंडांची व्यवस्था नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत नदीत मूर्ती विसर्जनासाठी गर्दी होती. तर, ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरात बहुतांश गणेशभक्तांनी मूर्तिदानाला प्राधान्य दिले. काहींनी तांबट कमानीपासून मूर्ती विसर्जित केल्या. कसबाबावडा परिसरातही मूर्तिदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने 160 हून अधिक कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. तर अवनी संस्थेच्या महिला कर्मचारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यासाठी कार्यरत होत्या. व्हाईट आर्मीच्या जवानाकडून ठिकठिकाणी मदतकार्य सुरू होते. रंकाळा तलावामागे इराणी खण परिसरात महापालिकेच्या वतीने स्वयंचलित यंत्राद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. सकाळी 10 ते सायंकाळी सहापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात दहा हजारहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. रात्री उशिरापर्यंत श्रींच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी आबालवृद्धांची गर्दी होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List