आम्ही मोदी सरकारचे नाही, तर जवानांच्या शौर्याचे ढोल वाजवणार; अरविंद सावंत यांनी लोकसभेत सुनावले
ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी मत व्यक्त केले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले. पहलगाम हल्ला झाल्यामुळे ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. जम्मू- कश्मीरमध्ये काही वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्यावर सशस्त्र जवान तौनात असायचे. मात्र, दुर्घटना घडली त्यावेळी सशस्त्र जवान किंवा पोलीस कोणीही नव्हते. पर्यटक आले असताना कडक बंदोबस्त का नव्हता, यापासून प्रश्न उपस्थित होत आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.
पुलवामा दुर्घटनेबाबत तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी जवानांसाठी विशेष विमानाची मागणी केली होती. मात्र, जवानांना विमान देण्यात आले नाही. मलिक यांना पंतप्रधानांशी चर्चाही करू दिली नाही. त्यावेळी पंतप्रधान जिम कॉर्बेट अभयारण्यात होते. त्या दुर्घटनेत 40 जवान शहीद झाले. त्यातील दहशतवाद्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, अद्याप दहशतवादी पकडण्यात आले नाहीत, त्याचे तुम्हाला काही वाटत नाही. असे असताना ते विजयाचे ढोल पिटत आहेत. पंतप्रधान इतरत्र फिरत आहेत. पण ते अजूनही मणीपूर आणि पहलगामला गेलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे ढोल वाजवणार नाही. आम्ही जवानांच्या शौर्याचे ढोल वाजवणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, असे सांगण्यात येत आहे. तर काही अटी किंवा शर्थी का त्यांच्यावर लादल्या नाहीत, असा सवालही सावंत यांनी केला. स्वतःला विश्वगुरू म्हणवतात पण या घटनेवेळी एकही देश आपल्यासोबत उभा का राहिला नाही, असा सवालही त्यांनी केला. आपल्याला तेलाचा पुरवठा करणाऱ्या इराणशीही आपले संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत, हे परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, असेही ते म्हणाले. एकही देश आपल्यासोबत का उभा राहिला नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. जी -7 मध्येही पंतप्रधानांना बोलावण्यात आले नाही, याचाही त्यांनी विचार करण्याची गरज आहे. तसेच
या कठीण काळात पूर्ण देश आणि विरोधी पक्षही सरकारसोबत ठाम उभा होता. त्यानंतर सरकारने अनेक देशांत शिष्टमंडळ पाठवले. पण त्यातून काय साध्य झाले, असा सवालही त्यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्याचे श्रेय घेत असताना त्यांना सरकार कठोर शब्दांत ठणकावत का नाही, हे युद्ध पाकिस्तानने शरणागती पत्करल्यामुळे थांबवले आहे. ट्रम्प यांच्या सांगण्यावरून नाही, हे त्यांना सांगण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
पाकिस्तान सापाप्रमाणे आहे, त्याला दूध पाजू नका, तो कधीही उलटेल, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द खरे ठरत आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. पाकिस्तानने शरणागती पत्करली असताना पाकव्याप्त कश्मीर घेण्याची हीच वेळ होती, असेही ते म्हणाले. हीच वेळ होती, पाकिस्तानला धडा शिकवण्याची, त्यांनी पीओके घेतले असते तर आम्ही पंतप्रधानांचे अभिनंदन केले असते. घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांनी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ज्या पद्धतीने मारले, त्याला घूसून मारणे म्हणतात, असेही ते म्हणाले. तसेच हिंदुस्थानविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, अशी विनंतीही अरविंद सावंत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List