‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेच्या दोन्ही सभागृहात 16 तासांची चर्चा होणार; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर 16 तासांची चर्चा सुरू होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दुपारी १२ वाजता ही चर्चा सुरू करतील. त्यानंतर, मंगळवारपासून राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर 16 तासांची चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून विरोधक सरकराला घेरण्याच्या तयारीत आहेत. याबाबत नेमके काय घडले, याची माहिती देशाला मिळणे गरजेचे असून याबाबत चर्चेची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत.
संसदेत या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी सरकारने आणि विरोधकांनी तयारी केली आहे. यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेसाठी संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे हे देखील चर्चेत सहभागी होतील.
सरकार ही चर्चेदरम्यान आक्रमकतेने बाजू मांडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने चालवलेली ही लष्करी कारवाई होती. ऑपरेशन सिंदूर अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण झाले आणि सर्व दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा करण्यात आला. हे 100% यशस्वी ऑपरेशन म्हणून वर्णन केले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारकडून उत्तरे मागत आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. व्यवसाय सल्लागार समितीने या चर्चेसाठी वेळ निश्चित केली. सरकारने स्पष्ट केले आहे की ते ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा करण्यास तयार आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले होते की सरकार सर्व सत्य देशासमोर ठेवण्यास तयार आहे. आता सोमवारपासून या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List