विज्ञान रंजन – नदीला पूर आलेला…

विज्ञान रंजन – नदीला पूर आलेला…

>> विनायक

असा हा बेभान हा वारा… नदीला पूर आलेला…  हे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं, हृदयनाथांनी संगीत दिलेले, लतादीदीने गायलेले अप्रतिम गीत. यातल्या नदीच्या पुराचे सध्याचे दिवस. देशभर पाऊस कोसळत असल्याचे आणि तिकडे अमेरिकेतील ‘टेक्सास’ नदीसुद्धा किनारे फोडून बेभानपणे वस्त्या गिळत चालल्याची वृत्तं दिसतायत. समुद्राची त्सुनामी अकल्पित भूकंपामुळे उसळते, तर नदीला पूर ‘अवचित’ येतो; कारण नदीच्या उताराच्या प्रवासात, सुरुवातीच्या गावात धो धो पाऊस पडला की प्रवाह बघता बघता फोफावतो आणि अचानक ‘कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी’  या कुसुमाग्रजांच्या शब्दातल्या नदीचं रौद्र रूप दिसू लागतं. समुद्राच्या, एरवीच्या भरती-ओहोटीला किनाऱ्याची मर्यादा असते. नदीचं पात्र अशी सीमा पाळत नाही. पाणी सर्वदूर पसरू लागते. त्यातच भरतीची वेळ असेल तर संगमाच्या ठिकाणी समुद्री लाटांचंच पाणी उलटं नद्यांच्या पाण्याला मागे लोटतं. 26 जुलै 2005 रोजी मुंबई ते बद‌लापूर परिसराने एकाच वेळी महामेघफुटी, सागरी भरती आणि व उल्हास ते मिठीसारख्या अनेक नद्यांच्या फोफावण्याचा भीषण अनुभव एकाच वेळी घेतला.

पृथ्वीवर जे (अवघं) दोन टक्के गोड पाणी आहे त्यातलं बरेचसं हिमनगात गोठलेय. बाकीच्या नद्या-तळ्य़ांमधे आणि भूपृष्ठाखाली साचलेल्या स्थितीत असतं. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे नैसर्गिक उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) होऊन हे गोड पाणी निर्माण झालेले असते. पावसाच्या रूपाने ते भूपृष्ठावर पडतं. हा वार्षिक कार्यक्रम निसर्ग नियमितपणे करतो. फक्त त्याच्या लहरीनुसार काही वेळा ए‌काच ठिकाणी अनेक किलोमीटर जाडीच्या ‘निम्बस’ ढगांची ढगफुटी होते आणि हाहाकार उडतो.

हे ‘आकाशात् पतितं तोयं, यथा गच्छति सागरम्‌’ या न्यायाने नद्यामधलं खूपसं पाणी पुन्हा समुद्रालाच मिळतं. पृथ्वीवर मोठय़ा-छोटय़ा अशा हजारो नद्या आहेत. त्यापैकी बहुतेक छोटय़ा नद्या, नाले, ओढे जवळच्या नदीला मिळतात. काही मोठय़ा नद्याही एकमेकीत विलीन होऊन पुढे एकच नदी होते आणि सर्व ठिकाणचं पाणी जास्त प्रमाणात जमा झाल्याने नदीचं पात्र रुंदावत जाते. कधीकधी तर पलीकडचा किनारा दिसणार नाही इतकं विशाल असतं. ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारत हिंदुस्थानातील अशीच महाकाय नदी. म्हणूनच तिला ब्रह्मपुत्र ‘नद’ म्हणतात.

आपल्या देशात सिंधू, रावी, सतलज, बियास (व्यास), गंगा, यमुना, गंडकी, कोसला, नर्मदा, तापी, कोसी अशा अनेक मोठय़ा नद्या उत्तर भारतात वाहतात, तर दक्षिण भारतात गोदावरी, कृष्णा,भीमा, कावेरी अशा खूप मोठय़ा आणि त्यांच्या अनेक उपनद्याचं जाळं आहे. त्यामुळेच, चार महिन्यांच्या आपल्या पावसाळी प्रदेशाचं ’सुजलाम् सुफलाम्’मध्ये रूपांतर झालेलं दिसतं.

पावसाची पारंपरिक ’शिस्त’ बिघडली असली तरी पाऊस कधी कमी, तर कधी नको तेवढा पडतो. त्यावर आपलं नियंत्रण नाही. मात्र पाऊस पडेल तेव्हाच त्याचा थेंब न् थेंब काही करून साठवायला हवा. अन्यथा, निसर्ग मुसळधार सरींची बरसात करून जे पर्जन्यदान देईल ते सारं पुन्हा समुद्राकडेच जाईल. हे सत्य प्राचीन संस्कृतीला, त्यातही हिंदुस्थानी लोकांना चांगलेच ठाऊक होतं. त्यामुळे नगर तिथे तलाव आणि विहिरीचं प्रमाण मोठं होते. पूर्वी मुंबई शहरात सुमारे 100 आणि ठाण्यात 50 तलाव होते. मुंबईतलाच आमच्या वस्तीत सात-आठ मोठय़ा बांधीव विहिरी होत्या. दूरवरून पाणी आणल्यावर नळांची ‘सोय’ झाल्याने हे जलसाठे बुजवले गेले.

एक ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शून्य. या गणिताचा अंदाज आला तर दरवर्षी जगभरच्या नद्यांमधून समुद्राला (परत) मिळणाऱ्या पाण्याचा 38 ट्रिलियन घनमीटरचा हिशेब करून पाहा. प्रचंड ‘गोड’ पाणी प्रतिवर्षी पुन्हा खाऱ्या पाण्यात मिसळते. ते ‘पकडता’ नि ‘साठवता’ आलं तर ’डिसॅलिनेशन (निःक्षारीकरण) वगैरे प्रकल्पांची गरज भासणार नाही, कारण या प्रकल्पाला कृत्रिम उर्जा लागते, पाणी साठवायला नाही.

नद्यांमधे थेट पावसाचं पाणी येते, त्याचप्रमाणे आसपासच्या भूभागात मुरलेलं पाणीही झिरपत नदीप्रवाहात मिसळत असते. त्याचे प्रमाणही खूप असते. भूपृष्ठाखालचे पाणी जसं नद्या जलसमृद्ध करतं तसेच ते अनेक ठिकाणी थेट समुद्राकडेच झिरपत जाते. त्याला ’सबटेरेनियन एस्टय़ुरिस म्हणतात. याचा अर्थ जमिनीखाली साचलेले प्रवाही पाणी सर्व नद्या दरवर्षी जेवढं पाणी सागराला दान करतात, जवळपास तितकेच किंवा जरा जास्तच पाणी या भूगर्भातील प्रवाहांमधून समुद्रांना मिळतं.

आपल्या देशात नद्यांमधून 1870 क्युबिक किलोमीटर पाणी वाहतं. त्यापैकी 1200 क्युबिक किलोमीटर पुन्हा समुद्रात जातं. विशेष म्हणजे, प्रतिवर्षी जगातल्या सर्व नद्यांमधून जेवढं पाणी सागराला मिळतं त्यापैकी एकटय़ा ‘अॅमेझॉन’ या अमेरिकेतील नदीतून 20 टक्के पाणी सागरार्पण होते. जगातील सर्वात मोठी नदी मात्र इजिप्तमधील संथवाहिनी नाइल (6850 कि.मी.) आहे. अॅमेझॉन नदी 6470 कि.मी. वाहते. आपल्या देशात सिंधू 3100 तर गंगा 2424 किलोमीटर वाहतात. महाराष्ट्रात गोदावरी सर्वात मोठी नदी असून ती 1495 कि.मी. वाहते. या सर्व नद्यांचं सागराकडे परत जाणारं पाणी थोडं जरी साठवता आलं तरी दुष्काळ नष्ट होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक बटन दाबलं तर गिरीश महाजन जमीनदोस्त व्हाल, प्रफुल्ल लोढा यांचा इशारा; VIDEO व्हायरल एक बटन दाबलं तर गिरीश महाजन जमीनदोस्त व्हाल, प्रफुल्ल लोढा यांचा इशारा; VIDEO व्हायरल
नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी प्रफुल्ल लोढा याला अटक करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये असून...
वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले
Mumbai News – वांद्रे परिसरातील सरकारी कॉलनीत 16व्या मजल्यावरून महिलेची उडी, पोलीस तपास सुरू
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची कार्यवाही सुरू, 200 पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा
तुमचा राजकीय वापर का होऊ देता? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी
देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे रहस्य उलगडणार मोठ्या पडद्यावर
लातूरमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, कृषिमंत्र्यांवर कारवाई कधी? रोहित पवार यांचा सवाल