इस्रायलचा गाझापट्टीत गोळीबार आणि हवाई हल्ले; 74 पॅलेस्टिनींचा मृत्यू
इराणसोबत युद्धबंदी झाल्यानंतर आता इस्रायलने पुन्हा एकदा गाझापट्टीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत आणखी तणाव वाढला असून इस्रायलने गाझापट्टीत काही आठवड्यांतील सर्वात मोठे हल्ले केले. इस्रायली सैन्याच्या जवानांनी गाझापट्टीत अंधाधुंद गोळीबार केला तसेच हवाई हल्लेही केले. या हल्ल्यांमध्ये तब्बल 74 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. दरम्यान, इराणसोबतचा तणाव कमी झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने युद्धबंदीसाठी नव्याने चर्चा सुरू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांना स्थलांतराचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर विस्थापन सुरू झाल्याचे चित्र आहे. गाझापट्टीत सोमवारी विध्वंसाचे भयंकर स्वरुप दिसल्याचे गाझा शहरातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एकापाठोपाठ स्फोट सुरू होते. त्यात शाळा आणि घरे उद्ध्वस्त झाली. या भंयकर हल्ल्यात जमीनही अक्षरशः भूकंप झाल्यासारखी हादरून गेली. गाझा शहरातील झैतून उपनगरात इस्रायली टँक घुसले असून लढाऊ विमानांच्या माध्यमातून चार शाळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यापूर्वी त्या शाळांमध्ये लपलेल्या शेकडो कुटुंबांना बाहेर पडण्यास सांगण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून आतापर्यंत जवळपास 500 पॅलेस्टिनींचा इस्रायली सैन्याच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
अन्नाची पाकिचे घेऊन परतणाऱ्यांवर गोळीबार
हवाई हल्ल्यात आणि गोळीबारात मृत्युमूखी पडलेल्यांचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रस्तोरस्ती पडलेला रक्ताचा सडा, छिन्नविछिन्न मृतदेह असे अंगावर अक्षरशः काटा आणणारे चित्र या व्हिडिओत दिसत आहे. इस्रायलच्या सैन्याने अन्नाची पाकिटे घेऊन परतणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांवरही तुफान गोळीबार केला. यात 11 जणांचा मृत्यू झाला. दक्षिण गाझामध्ये ही घटना घडली. गाझापट्टीत दाखल झालेल्या मानवतावादी मदतीसाठी दक्षिण गाझात पॅलेस्टिनींची गर्दी झाली होती. येथून अन्नाची पाकिटे घेऊन पॅलेस्टिनी नागरिक परतत होते.
हल्ल्यात मुले, महिला आणि पत्रकार मृत्युमुखी
सोमवारी झालेल्या हल्ल्यात झैतूनमध्ये 10, गाझा शहराच्या नैऋत्यभागात 13 तर समुद्रकिनाऱ्यावरील एका कॅफेमघ्ये झालेल्या हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, मुले आणि एका स्थानिक पत्रकाराचा समावेश असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी पत्रकारांच्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत 220 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला. आणखी दोन हवाई हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याचे सैफी रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. तर झावैदा शहरात सहा जणांचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List