आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई शंभुराज देसाईंना भिडले, विधानसभेत खडाजंगी
वांद्रे येथील संरक्षण विभागाच्या जमिनीबाबत पाठपुराव्यावरून मंत्र्यांनी विधानसभेची दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेचे सदस्य कमालीचे आक्रमक झाले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई आणि मंत्री शंभुराज देसाई यांची जोरदार खडाजंगी झाली. भास्कर जाधव यांनी तांत्रिक मुद्दय़ावर बोट ठेवत सरकारचे मंत्री कोणत्याही प्रश्नाला उठसूठ उत्तरे देत असल्याचे सांगताच सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. शिवसेनेचे सदस्यही आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि मंत्रीही अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत (वेल) येऊन गोंधळ घालू लागले. अखेर तालिका अध्यक्षांना विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून वांद्रे पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या रखडलेल्या प्रश्नांना वाचा पह्डली. संरक्षण खात्याची एनओसी येत नसल्यामुळे पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे दहा हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन रखडले आहे. धारावीमध्ये ज्या प्रकारे पुनर्वसन झाले त्या धर्तीवर पुनर्वसन होईल का, असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी विचारला. आदित्य ठाकरे यांनीही यानिमित्ताने वरळीतील प्रश्नांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, माझ्यासह इतरही अनेक मतदारसंघांत असेच विषय आहेत. माझ्याकडे तर सतरा वर्षे नौदलाची एनओसी नाही म्हणून ‘महाकाली’चा प्रकल्प रखडल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित सर्व आमदारांची आधी माझ्या दालनात बैठक घेईन. त्यांच्याकडून हे विषय घेऊन ज्या वेळी लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री हे केंद्रातील प्रलंबित प्रकल्पांबाबत खासदारांची बैठक घेतील तेव्हा त्यांना सर्वंकष प्रस्ताव सादर करू असे उत्तर दिले.
मंत्र्यांच्या उत्तराने वरुण सरदेसाई यांचे समाधान झाले नाही. या विषयावर 2017 पासून लक्षवेधी लागत आहेत, पण या विषयावर सरकार कोणतेच ठोस उत्तर देत नाही. त्यावर शंभुराज देसाई यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेले वरुण सरदेसाई म्हणाले की, मंत्री महोदयांना ब्रिफिंगच केलेले नाही. सरकारला या प्रश्नाची कल्पनाच नाही, असा टोला लगावला. त्यावर शंभुराज देसाई भडकले आणि आमची लायकी काढू नका असे सांगितले. तेव्हा आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आक्रमक झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही वादात उडी घेतली. सरकारला लाज आहे का, असे कसे बोलता?, असे पाटील म्हणाले. अखेर या प्रकल्पातील रखडलेल्या कामांसाठी शंभुराज देसाई यांनी सर्व आमदारांसोबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, ज्या मतदारसंघात हे प्रकल्प रखडले आहेत, त्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतली जाईल. पेंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले.
मग हक्कभंग आणायचा का?
मंत्र्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे संतप्त झालेल्या आदित्य ठाकरे यांनी शंभुराज देसाई यांना धारेवर धरले. मंत्री चुकीचं उत्तर देत आहेत, सभागृहाची दिशाभूल करत आहेत, मग हक्कभंग आणायचा का, असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये संरक्षण भूखंडाच्या एनओसीसाठी केंद्राकडे दोन बैठका घेतल्याच्या कागदपत्रांचे पुरावे आदित्य ठाकरे यांनी अध्यक्षांना दाखवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List