Thane News – डहाणू-जव्हार मार्गावर संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात, 13 प्रवासी जखमी
डहाणू-जव्हार मार्गावर कवडास धरणाजवळील तीव्र उतारावर मंगळवारी सकाळी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. डहाणूहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. मंगळवारी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास तलवाडा येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने अचानक आपली मार्गिका बदलत एसटीच्या समोर आला. यामुळे बस चालक अर्जुन अनाखे यांनी प्रसंगावधान राखत बस वाचवण्यासाठी थेट रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र बाजूला चिखल व खोल उतार असल्याने बस झाडावर आदळली. बसमध्ये 26 प्रवासी होते. अपघातात बसचा पुढील भाग चक्काचूर झाला.
या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डहाणू-जव्हार मार्गावरील कवडास धरण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. या ठिकाणी तीव्र उतार व बाजूला खोल दरी असल्याने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मागणी मान्य करून संरक्षण भिंतीसाठी मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आजच्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभागाची ढिसाळ कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List