मोदी आणि भागवतांवर अर्बन नक्षल म्हणून गुन्हे दाखल करणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके- 47 आणि टॉमी गन यासारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. मग महायुती सरकार जनसुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का? असा बोचरा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. जनसुरक्षा कायदा ही अघोषित आणीबाणी असून त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जनसुरक्षा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भारतीय जनता पक्षाने जनसुरक्षा कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता. आता त्याविरोधात न्यायालयात जाणार आहोत आणि इतर राजकीय पक्षांनीही या लढय़ात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.
हिंदुस्थानी लष्करात विशिष्ट सैनिकांनाच जी शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे त्या शस्त्रांची पूजा मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी करतात. ही शस्त्रे आरएसएसकडे आली कुठून? ज्यांच्याकडे ही शस्त्रs आहेत, त्यांच्यावर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे की नाही? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला. कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसा एके-47 आणि टॉमी गन यासारखी शस्त्रs बाळगणे हाही कायद्यान्वये गुन्हा आहे. आरएसएस ही शस्त्रs जवळ बाळगते त्यांच्याविरोधात जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आधी कारवाई करा, असे आंबेडकर म्हणाले.
ज्यांच्याकडे शस्त्रे, दारूगोळा आहे, त्याला जनसुरक्षा कायद्यांतर्गत सरकार नक्षलवादी ठरवू शकते. कारण ते बेकायदेशीर मार्गाने राज्याला उलथवून टाकू पाहत आहेत असा त्याचा अर्थ होतो. अशी बेकायदेशीर मार्गाने जमवलेली शस्त्रs, दारूगोळा आरएसएसवाल्यांकडे आहे. त्यांनी तो सार्वजनिकरीत्या जाहीर केला आहे. मग त्यांच्यावर कारवाई होणार का? हा मोठा प्रश्न असल्याचे आंबेडकर म्हणाले.
कायद्याच्या विरोधकांच्या पाठीशी विरोधी पक्षाने उभे रहावे
जनसुरक्षा विधेयकाला विधिमंडळात आक्रमकपणे विरोध झाला नाही. एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र, दारूगोळय़ाची मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस पूजा करतायत, या विरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी जाहीर करा, अशी मागणी केली तर त्या माणसाच्या मागे सर्व विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे, तरच तुम्ही खऱया अर्थाने विरोधक आहात हे दिसेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मोर्चालाही अर्बन नक्षलवाद म्हणणार का?
कामगारांच्या मोर्चाला अर्बन नक्षलवाद म्हणणार का? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला तर त्यालाही तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का? शेतकऱयांनी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्यालाही तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? खासगी सावकारांच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का? सरकार नेमके कोणाला अर्बन नक्षलवादी ठरवणार आहे? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List