ओदिशात चकमकीत सुरक्षा दलांकडून दोन नक्षलवादी ठार, घटनास्थळावरून दारूगोळा आणि वॉकी-टॉकी जप्त
ओदिशातील कंधमाल जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि नक्षरलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. बालिगुडा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या संरक्षित वनक्षेत्रात ही चकमक झाली. ठार केलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून मनकू आणि चंदन अशी त्यांची नावे आहेत.
मनकू हा बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा एरिया कमिटी मेंबर (एसीएम) होता, तर चंदन हा सक्रिय सदस्य होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बालीगुडा पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात काही माओवादी लपून बसल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा स्वयंसेवी दलाच्या (डीव्हीएफ) पथकाने तात्काळ कारवाई करत परिसरात शोध मोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. चकमकीत मनकू आणि चंदन हे माओवादी ठार झाले. घटनास्थळाहून एक रायफल, दोन रिव्हॉल्व्हर, मोठ्या प्रमाणात काडतुसे, वॉकी-टॉकी सेट, बॅटरी आणि इतर नक्षलवादी वस्तू जप्त केल्या आहेत. नक्षलवादाविरुद्धची कारवाई सुरूच राहील आणि लवकरच त्यांचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट केले जाईल, असे राज्य पोलिसांनी स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List