5 जुलैला मराठी विजय दिवस! चलो वरळी! मेळाव्याची मोर्चेबांधणी जोरात… जल्लोष तर होणारच
मराठी माणूस विखुरलाय असे वाटल्यानंतर मराठीद्रोही पुन्हा डोके वर काढतात. काल आपण ते डोके चिरडून टाकले आहेच, पण त्यांनी पुन्हा फणा वर काढू नये म्हणून एकजूट कायम ठेवली पाहिजे.
विजयी मेळाव्यात मराठी एकजुटीचे विराट दर्शन घडणार आहे. त्यामुळे मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठका सुरू आहेत.
हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एल्गार पुकारल्याने सरकारने गुडघे टेकत शासकीय आदेश मागे घेतला. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे. वरळी येथील डोम सभागृहात हा विजयोत्सव होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी हा विजयी मेळावा अभूतपूर्व होईल असे सूतोवाच आज विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. 5 तारखेला विजयोत्सव साजरा करणारच आहोत. आम्ही सगळय़ांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हेसुद्धा याबद्दल बोलले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. येत्या 5 तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल, असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांचा मला फोन आला होता. विजयी मेळाव्याबाबत त्यांनी विचारणा केली. मी त्यांना चालेल म्हणालो, असेही राज यांनी नमूद केले.
भाषेची थट्टा करू नका
हा शिक्षणाचा विषय आहे. त्यात सरकारने नरेंद्र जाधव या अर्थतज्ञांची समिती नेमली आहे. भाषेची अशी थट्टा करू नका, कोणाचीही समिती नेमली. काहीही अहवाल दिला तरी हिंदीची सक्ती आता संपली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कमळी कोणत्या भाषेत शिकली?
वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या कमळीच्या जाहिरातीकडे बोट दाखवत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. मार्क्स मिळाले शंभरपैकी शंभर, कमळी आमची एक नंबर. ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली हे पाहावे लागेल. कमळी ज्या शाळेत शिकली तिथे कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने शंभर मार्क कसे मिळवले, की त्या शंभर मार्कात तिने ईव्हीएम वापरले होते का, याची आपल्याला उत्सुकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List