संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असून, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या मोठय़ा कारवाईमुळे संगमनेर पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात दोन हजार 700 किलो गोवंश मांसासह 34 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा मारल्यानंतर आरोपी पळून गेले. मात्र, पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हाजी मुदस्सर कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर (फरार), नवाझ जावेद कुरेशी (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर (फरार), फईम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही (फरार), अक्रम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही (फरार), समीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही (फरार) यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात इसमांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजित जाधव, बाळसाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे या पथकाद्वारे संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू होती.
पोलीस पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत होते. यावेळी जमजम कॉलनी, 9 नंबर गल्ली, संगमनेर येथे हाजी मुदस्सर कुरेशी व नवाझ जावेद कुरेशी हे पत्र्याच्या गोडाऊनमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला असता, आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळले. पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले.
पथकाने घटनास्थळावरून 34 लाख 84 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात दोन हजार 700 किलो गोमांस, दोन महिंद्रा बोलेरो पिकअप, एक अशोक लेलॅण्ड कंपनीचा बडा दोस्त, 5 दुचाकी, 4 इलेक्ट्रिक वजनकाटे, लोखंडी सुरा व लोखंडी कुऱहाड व 2 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List