जग्गूदादाला हवीय वाळकेश्वरच्या चाळीतील ‘ती’ खोली
ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी वाळकेश्वरच्या तीनबत्ती भागातील एका चाळीत आयुष्याची 33 वर्षे घालवली. या जागेशी त्यांच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. ते आजही अनेकदा चाळीला भेट देतात. चाळीत ज्या खोलीत ते राहायचे, ती खोली त्यांना भाडय़ाने घ्यायची आहे, मात्र घरमालक त्यांना खोली भाडय़ाने देत नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
जॅकी श्रॉफ तीनबत्ती चाळीत लहानाचे मोठे झाले. त्यांचे बालपण फार हलाखीत गेले. त्यांनी एकेकाळी शेंगदाणे विकले, चित्रपटाची तिकिटंही विकली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॅकी यांनी चाळीबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 33 वर्षे चाळीतील ज्या खोलीत घालवली, ती खोली भाडय़ाने घ्यायची आहे, पण घरमालक तयार होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. अजूनही ते चाळीला भेट देतात, फिरतात आणि तिथे काही वेळ घालवतात, असेही त्यांनी सांगितले.
मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘चाळीतील खोली भाडय़ाने घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, पण मालक मला ती खोली परत देत नाही. मी त्याला म्हणतो, भावा, मी ती घेऊन पळून जाणार नाही. आता तिथे 4 जण राहत आहेत, ते जे भाडं देतात तेच मी तुला देईन, पण तो तयार होत नाहीये.’
भावाच्या निधनानंतर सोडली खोली
माझ्या भावाच्या निधनानंतर माझ्या आईने ती खोली सोडली. पण मला ती जागा जपायची आहे, तिथे काही वेळ घालवायचा आहे, त्या जागेची ऊर्जा अनुभवायची आहे. मालक मला ती खोली देत नसला तरी मी कधी कधी तिथे जातो, संध्याकाळी बाल्कनीत उभा राहतो, पान खातो,’ असं ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List