लेख – तरुणाईचे ‘भावनिक रणांगण’
>> महेश कोळी
एके काळी गतिशील संवादाचे माध्यम म्हणून आकाराला आलेला सोशल मीडिया जीवनाचे अविभाज्य अंग बनला असला तरी युवा पिढीमध्ये आज ते एक भावनिक रणांगण बनले आहे. फोटो, विचार, आठवणी शेअर करण्यापलीकडे मानसिक तणाव, नात्यांतील विसंवाद आणि सामाजिक कुपरिणामांच्या दिशेने सुरू झालेला याचा प्रवास गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. विशेषतः युवकांमध्ये सुरू झालेला हा प्रवाह आता संवेदनशीलतेच्या सीमारेषा ओलांडू लागला आहे. सोशल मीडियावरील स्टेटस, पोस्टस् आणि त्यातील ओळी मानवी नात्यांना छिन्नविच्छिन्न करू लागल्या आहेत.
सामाजिक माध्यमांचा वापर आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुक इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप, यूटय़ूब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक आपले विचार, भावना, अनुभव सतत शेअर करत असतात. ही माध्यमे जरी संवादाची साधने असली तरी त्यांचा अतिरेकी किंवा असंवेदनशील वापर वैयक्तिक, कौटुंबिक व वैवाहिक नात्यांमध्ये संघर्ष निर्माण करत आहे. एकेकाळी गतिशील संवादाचे माध्यम म्हणून आकाराला आलेला सोशल मीडिया युवा पिढीमध्ये एक भावनिक रणांगण बनला आहे. फोटो, विचार, आठवणी शेअर करण्यापलीकडे मानसिक तणाव, नात्यांतील विसंवाद आणि सामाजिक कुपरिणामांच्या दिशेने सुरू झालेला याचा प्रवास गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे.
इन्स्टाग्राम स्टोरी किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस ही प्रत्यक्षात पाहिल्यास क्षुल्लक साधनं आहेत, पण आज त्यांच्या आधारे किंवा त्यांच्यामुळे युवा पिढीत नातेसंबंधांमध्ये ठिणग्या पडताहेत. तरुणाईच नव्हे, तर कौटुंबिक, वैवाहिक नात्यांतही याचे पडसाद उमटताना दिसताहेत. याचे कारण सोशल मीडियावरून संवाद करताना अनेकदा व्यक्त होणाऱ्या भावना शब्दांच्या पलीकडील असतात. त्यामुळे एका साध्या ओळीचा अर्थ समोरची व्यक्ती वेगळ्या संदर्भात घेते आणि तिथून समज-गैरसमजांची साखळी सुरू होते. उदाहरणार्थ, ‘सतत हसतमुख असणारी माणसं मनानं निर्मळ असतातच असं नाही’ अशा आशयाचा एखादा सुविचार आवडला म्हणून कुणी स्टेटसला ठेवला तर ते पाहणारा प्रत्येक जण त्याला स्वतःशी जोडून पाहतो आणि स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीशी असणाऱ्या संबंधांच्या परिप्रेक्ष्यातून त्याकडे पाहतो. त्यातून बहुतेकदा गैरसमज करुन घेतले जातात. मग संवादाऐवजी मौन, तणाव, राग, संशय वाढतो. हे स्टेटस ‘फॉरवर्डेड’ असले तरी भावनांवर होणारे परिणाम ‘डायरेक्ट’ असतात. यातून मित्र, प्रियकर-प्रेयसी, कुटुंबीय यांच्यातील लपवलेले ताण आता सार्वजनिकपणे उघड पडू लागले आहेत. पूर्वी चार भिंतींआड बोललं जायचं ते आज पोस्ट टाकून मांडले जाऊ लागल्यामुळे हजारो जणांसमोर ते जाते आणि त्यातून निर्माण होणारे वाद कधी पोलीस ठाण्यापर्यंत, तर कधी न्यायालयापर्यंतही जाताहेत. अलीकडील काळातील घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये कित्येकदा सोशल मीडियाचा संबंध कुठे ना कुठे तरी असतोच, असे या क्षेत्रात समुपदेशन करणारी मंडळी सांगतात. वैवाहिक नातेसंबंध हे परस्पर विश्वास, संवाद व एकमेकांशी बांधीलकीवर आधारित असतात. सोशल मीडियामुळे यामध्ये विविध प्रकारचे अडथळे निर्माण होताहेत. जोडीदाराच्या पोस्ट, लाईक्स किंवा फॉलो केलेल्या व्यक्तींमुळे संशयाची बीजपेरणी होत जाते. दोघांपैकी कोणी सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असल्यास दुसऱ्याला उपेक्षा वाटते. सोशल मीडियावर इतरांच्या आदर्श वैवाहिक जीवनाचे प्रदर्शन पाहून आपल्याच नात्याची तुलना केली जाते, ज्यामुळे असमाधान निर्माण होते. पती-पत्नीमधील खासगी गोष्टी शेअर केल्या गेल्यास एकमेकांमध्ये राग आणि तिरस्कार निर्माण होतो. मैत्रीच्या नात्यातही हे घडत आहे. पूर्वी एखाद्या मित्राची एखादी गोष्ट खटकली तर चर्चा वा समेट व्हायचा, पण आता ‘ब्लॉक’, ‘अनफ्रेंड’ ही क्रिया इतकी सहज झाली आहे की, मैत्री संवाद न घडताच क्षणात संपते.
समाजशास्त्रज्ञ या बदलत्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सांगताहेत की, सोशल मीडिया ही संवादवाहिनी न राहता राग, दुःख, सूड, वैफल्य या साऱ्या भावनांचा भडिमार करण्यासाठीचे एक आयुध बनले आहे. आज शेकडो-हजारो तरुणांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, पती-पत्नींचा दिवसातील बराचसा वेळ किंवा संवाद हा सोशल मीडियाशी संबंधित असतो. त्यातील तपशील पाहिल्यास फुटकळ किंवा क्षुल्लक किंवा निरर्थक मुद्दय़ांवरून सुरू झालेल्या या चर्चा बहुतांश वेळा टोकाच्या वादापर्यंत, भांडणांपर्यंत पोहोचतात. दुर्दैवाने याचे परिणाम तात्पुरते राहत नाहीत, तर ते दीर्घकालीन होतात, पण याचे गांभीर्यच कुणाला उरलेले नाहीये. भावनांचे सार्वजनिक प्रदर्शन हे एक मानसिक असंतुलनाचे लक्षण मानले जाते. यामुळे केवळ मानसिक तणाव वाढत नाही, तर अनेक वेळा नाती तुटतातही!
सायबर कायदेतज्ञांच्या मते, एखाद्याचे फेक प्रोफाईल तयार करणे, ट्रोलिंग करणे, अश्लील मजकूर टाकणे किंवा कोणाचीही बदनामी करणे या सर्व डिजिटल विश्वातील कृती भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे आहेत. यासाठी 3 ते 7 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आहे. तरीही अनेक युवक-युवती या गोष्टींकडे गांभीर्याने न पाहता भावनांच्या आहारी जातात आणि वाटेल ती शेरेबाजी करणाऱ्या पोस्टस् समाज माध्यमांमध्ये टाकताना दिसतात.
प्रत्यक्षात सोशल मीडिया ही संवादाची सोय आहे, संवादाची जागा नाही. खऱ्या भावना या समोरासमोर बसून ऐकणे, समजून घेणे आणि स्वीकारणे गरजेचे असते, पण आजच्या पिढीने ब्लॉक-अनब्लॉक हेच संवादाचे नवे साधन मानले आहे. यातून ताणतणाव, विसंवाद, सामाजिक एकटेपण, यांसारख्या समस्या तरुणाईत वाढत चालल्या आहेत. तसेच सततच्या निगेटिव्ह वर्तणुकीचा परिणाम आत्मविश्वासाबरोबरच शिक्षण, करीअर आणि नात्यांवर होत आहे. सोशल मीडियावर व्यक्त झालेला राग हे तात्पुरते समाधान देणारा असला तरी दीर्घकाळच्या मनोवेदना देणारा असतो.
हे टाळण्यासाठी काय करायला हवं?
कुठलेही स्टेटस, पोस्ट ही सार्वजनिक होते. त्याचा परिणाम किती खोलवर जाईल, हे कोणालाच सांगता येत नाही. हे लक्षात ठेवूनच आणि विचार करूनच पोस्ट करा. दुसरे असे की, गोंधळ, गैरसमज, अपमान या सर्वांबाबतचे उत्तर पोस्टमध्ये नाही, तर समोरासमोर किंवा प्रत्यक्ष चर्चेत आहे. जगातील अनेक महाबिकट प्रसंग, इतकेच नव्हे तर घनघोर युद्धेही प्रत्यक्ष संवादाच्या मार्गानेच संपुष्टात आली आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे कसल्याही प्रकारचे गैरसमज, राग असले तरी संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधा. सोशल मीडियावर वावरत असताना टोमणे ऐकणे, स्वाभिमान दुखावणे, नकारात्मक टिपण्या होणे या गोष्टी घडतात हे वास्तव स्वीकारा आणि त्यानुसार त्यांमध्ये किती गुंतून पडायचे हे ठरवा. फेक प्रोफाईल, ट्रोलिंग, बदनामी हे सर्व कायद्याच्या कचाटय़ात आणणारे गुन्हे आहेत. शेअर करत असलेली प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचा. ही गोष्ट जर कोणी माझ्याविषयी लिहिली असती तर? असा विचार करा.
लक्षात घ्या, संवादासाठी सोशल मीडिया वापरणं चुकीचं नाही, पण भावना, नाती आणि व्यक्तिमत्त्व यांचं राजकारण तिथं करणं निश्चितच अपायकारक आहे. त्यातून समाज माध्यमांवर माणूस जितका वेगाने कनेक्ट होतो, तितकाच तो स्वतःपासून आणि आपल्या जवळच्यांपासून डिस्कनेक्ट होतो. त्यामुळे आभासी जगाच्या आहारी न जाता रिअल लाईफमध्ये जगण्याला प्राधान्य द्या. वैयक्तिक नात्यांची जपणूक पोस्टमधून होत नाही. त्यासाठी संवाद, सहानुभूती आणि ऐकण्याची संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. आपण या भावनिक रणांगणाला एक सुसंवादाचे व्यासपीठ बनवू शकतो.
जाता जाता शेवटचा मुद्दा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिवापर ज्याप्रमाणे माणसाला बुद्धिमंदत्व आणण्यास कारणीभूत ठरू शकतो, तसाच सोशल मीडियातली गुरफट माणसाची विचारशक्ती मंदावू शकते. तेव्हा आभासी जगाच्या मगरमिठीतून वेळीच बाहेर पडा !
(लेखक संगणक अभियंता आहेत)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List