इंग्लंडचं ठरलं! हिंदुस्थानचं कधी ठरणार? हिंदुस्थानचे अंतिम अकरा अद्यापही गुलदस्त्यात
लीड्स जिंकणाऱया इंग्लंडने आपल्या विजयी संघाला शाबासकी दिलीय. बर्मिंगहॅम कसोटीच्या दोन दिवस आधीच आपला संघ जाहीर करून त्यांनी आपलं सर्व ठरल्याचे दाखवून दिले. मात्र वर्कलोडच्या नावाखाली जसप्रीत बुमराला विश्रांती द्यायची की मालिकेत बरोबरी साधण्यासाठी खेळवायचे, या द्विधामनःस्थितीत असलेल्या हिंदुस्थानी संघाचे सारे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे संघात कोणकोणत्या बदलासह हिंदुस्थानला इंग्लंडच्या बॅझबॉलसमोर उतरणार, हे खुद्द संघ व्यवस्थापनालाही माहीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यजमान इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱया दुसऱया कसोटीपूर्वी हिंदुस्थानी संघासमोर आपले उंचावलेले मनोधैर्य प्रखरपणे दिसून यावे म्हणून आपला लीड्सचा विजयी संघच कायम ठेवला आहे. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला त्यांनी आपल्या संभाव्य संघात स्थान दिले होते. मात्र संघ जाहीर करताना मात्र त्यांनी आर्चरला बाजूला ठेवून आम्ही विजयी संघासोबत खेळणार असल्याचे जाहीर केले.
लीड्स कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. त्यामुळे ख्रिस वोक्सला बाहेर बसवण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी चार वर्षे संघाबाहेर असलेल्या आर्चरला संघात घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र तो संघात स्थान मिळवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तो सराव सत्रातही सामील झाला नव्हता. त्यामुळे जोश टंग, ब्रायडन कार्स व ख्रिस वोक्स हे पहिल्या कसोटीला वेगवान त्रिकुट कायम ठेवण्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
हिंदुस्थान संभ्रमावस्थेत
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. जे लीड्सवर जमले नाही ते बार्ंमगहॅमला करून दाखवण्यासाठी हिंदुस्थानी संघ उत्सुक आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने बुमरा नामक अस्त्रासह यजमानांवर हल्ला करावा, अशी रणनीती आखली जात आहे. कारण आधीच पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विजय आवश्यक आहे. जर इथेही हिंदुस्थानचे पानीपत झाले तर इंग्लंडला मालिकाविजयापासून रोखणे कठीण होईल, याची हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे बुमराशिवाय खेळण्याची रिस्क घेणे हिंदुस्थानी संघाला महागात पडू शकते. तसेच बुमराला विश्रांती दिल्यास संघात कोणते बदल करावे, याबाबतही संघ व्यवस्थापन आपला अंतिम निर्णय घेऊ शकलेला नाही. रवींद्र जाडेजाच्या साथीने कुलदीप यादवला संधी द्यावी तसेच शार्दुल ठाकूरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला आजमावे, असाही विचार सध्या सुरू आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानच्या फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी फिरकीवीर वॉशिंग्टन सुंदरलाही स्थान देण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्या गिल आणि गंभीर आपला अंतिम अकरा जणांचा समतोल आणि बलशाली संघ जाहीर करून इंग्लंडला धक्का देतील, अशी अपेक्षा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List