कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय सुधारायचे नाव घेईना! गर्भवती महिलेला उपचार नाकारत खासगी रुग्णालयात पाठवले, गरीब कुटुंबाला 50 हजारांचा भुर्दंड
रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकिरीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोवर रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासनाचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिलेला उपचार नाकारत खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. यामुळे गरीब कुटुंबाला 50 हजार रुपयांचा उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागला.
घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या योगिता शाहू असे गर्भवती महिलेचे नाव आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात योगिता यांची नियमित तपासणी सुरू होती. 6 मे 2025 रोजी सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी 7 मे रोजी सकाळी 11 वाजता अॅडमिट होण्यास सांगितले होते. मात्र तेथे पोहोचल्यावर त्यांना अॅडमिट करून न घेता सायन रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. प्रसूती वेदना असह्य असल्याने तातडीने मुंबई गाठणे शक्य नव्हते. त्यामुळे शाहू कुटुंबीयांनी कर्ज काढून कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात योगिता यांना दाखल केले. मात्र त्यांचे बिल 40 ते 50 हजार रुपये आले आहे.
निष्काळजीपणाबद्दल संताप
पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी संताप व्यक्त केला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे साळवी यांनी तक्रार केली आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गरीब शाहू कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List