रोहितचा वारसदार सलामीवीरच; शुभमन गिलच जिंकणार निवड समितीचे दिल, राहुलचीही एण्ट्री, पंतच्या नावाचाही विचार
रोहित शर्माचा खरा वारसदार म्हणून शुभमन गिलचीच निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहितने संघाचे नेतृत्व करताना नेहमीच सलामीवीराचीच भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्याचा खरा वारसदार म्हणून सलामीवीराचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या धडाकेबाज सलामीमुळे कोटय़वधी तरुणींच्या गळय़ातला ताईत बनलेला गिलच निवड समितीचेही दिल जिंकणार असे संकेत मिळत असले तरी काही काळ सलामीला उतरलेल्या के. एल. राहुलचीही या शर्यतीत अनपेक्षित एण्ट्री झाली आहे. तसेच ऋषभ पंतच्या नावाचाही विचार सुरू आहे. मात्र दुखापतींमुळे जसप्रीत बुमरा कर्णधारपदाच्या शर्यतीत काहीसा मागे पडला आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील दारुण अपयशानंतरच रोहित शर्माचे नेतृत्व जाणार हे निश्चित होते. मात्र त्या मालिकेनंतर हिंदुस्थानी संघ तब्बल पाच महिने कसोटी खेळणार नसल्यामुळे रोहितने नेतृत्वाचा राजीनामा देणे टाळले होते. यादरम्यान हिंदुस्थानी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे त्याच्या मनात कसोटीत खेळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गेल्या वर्षभरात रोहितची फलंदाजीतील सुमार कामगिरी पाहता त्याला फलंदाज म्हणूनही त्याची संघात स्थान मिळण्याची पात्रता नव्हती. तेव्हाच रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे म्हणून निवड समितीवर दबाव वाढवला जात होता. तरीही रोहितचे संघातील वजन पाहता त्याला वगळण्याचे धाडस कुणालाही दाखवता आले नव्हते. अखेर ऑस्ट्रेलियात रोहितचे नेतृत्व आणि फलंदाजी उघडी पडल्यामुळे त्याच्या समय समाप्तीची घोषणा करण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत लाभले होते.
गिलच्या हाती नेतृत्वाची शक्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलला रोहित शर्मामुळे संघात फारच कमी संधी मिळाली. तसेच त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल करण्यात आला होता. मात्र सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये गिलचेच नाव सर्वात पुढे आहे. त्याचे फलंदाजीतील सातत्य आणि त्याचे वय अवघे 25 असल्यामुळे तोच या शर्यतीत निवड समितीची पहिली पसंत आहे. सलामीवीर म्हणून गिलने अवघ्या जगातील क्रिकेटप्रेमींचे हृदय जिंकल्यामुळे त्याने नेतृत्वपद जिंकले तरी कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.
राहुलही शर्यतीत आलाय…
गेल्या वर्षी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेला आणि कसोटीतील कामगिरीही फारशी समाधानकारक नसली तरी के. एल. राहुलही या शर्यतीत अनपेक्षितपणे धावू लागला आहे. संघात स्थान मिळवण्याची योग्यता नसतानाही राहुल अंतिम अकरात खेळतोय. सातत्यपूर्ण अपयशी ठरत असतानाही त्याच्यासाठी संघात वारंवार स्थान निर्माण केले जातेय. अशा या लाडक्या राहुलच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा होणेही खूप मोठी गोष्ट आहे. बीसीसीआय आणि निवड समितीच्या या लाडक्या राहुलला टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्वही मिळू शकते आणि याला कुणाचा विरोधही होणार नाही.
फिटनेस बुमराच्या मार्गात आडवी
रोहितनंतर टीम इंडियाचे नेतृत्व जसप्रीत बुमराकडे देण्याची तयारी केली जात होती. त्याची चाचपणी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत केली गेली. मात्र महत्त्वाच्या कसोटीत त्याच्या पाठीत उसण आल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आणि या निर्णयामुळे संघाला पराभवाचा धक्काही बसला. आधीच दीर्घ विश्रांतीनंतर बुमरा संघात परतला होता आणि त्यानंतर पुन्हा अनफिट झाल्यामुळे निवड समितीला त्याच्याबाबत नव्याने विचार करावा लागला. बुमराच्या फिटनेस संघासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे त्याच्यावर नेतृत्वाची अधिक जबाबदारी टाकणे योग्य नसल्याचे निवड समितीचे एकमत झाल्यामुळे त्याला यापासून दूर ठेवले जाणार आहे.
ऋषभ पंतही चर्चेत
हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक असलेला ऋषभ पंत हासुद्धा निवड समितीचा आवडता खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर हिंदुस्थानी संघाला लाभलेला पंत हा एक जिगरबाज खेळाडू आहे. यष्टिरक्षणात चपळ असलेला पंत फलंदाजीत नेहमीच संकटमोचकाची भूमिका निभावत आलाय. कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी तोसुद्धा योग्य पर्याय असल्याचे क्रिकेटतज्ञांचे मत आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला बाकावर बसवल्यापासून त्याचे मनोधैर्य खूपच खचले आहे. त्याचे दुष्परिणाम आयपीएलमध्ये दिसत असल्यामुळे निवड समिती याक्षणाला त्याच्याबाबत किती गांभीर्याने विचार करते हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List