तुम्ही घरी बसून युद्धाचं कौतुक करताय अन् इथे माझे कुटुंबीय..; मुस्लीम अभिनेत्याची भावूक पोस्ट
काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव आणखी वाढला आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. मात्र भारताच्या मजबूत हवाई यंत्रणांनी हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. या तणावाच्या परिस्थितीत अभिनेता अली गोणीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावूक पोस्ट लिहिली आहे. कुटुंबीयांसोबत फोटो शेअर करत त्याने त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. अली गोणी सध्या भारताबाहेर असून त्याचे कुटुंबीय जम्मूमध्ये अडकले आहेत.
अली गोणीची पोस्ट-
‘मी भारताबाहेर अडकलो असून माझी झोप उडाली आहे आणि मी पूर्णपणे बिथरलोय, कारण माझ्या कुटुंबीयांनी जम्मूमध्ये कात्री रात्री झालेल्या हल्ल्याचा सामना केला आहे. माझं संपूर्ण कुटुंब, लहान मुलं आणि त्यांचे आई-वडील हे ड्रोन आणि अस्वस्थतेच्या दहशतीचा सामना करत आहेत. तरीही काही लोक त्यांच्या घरी बसून युद्धाचं कौतुक करत आहेत, सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सीमेजवळील लोकांसाठी हे इतकं सोपं नाही. मी आपल्या भारतीय हवाई दलाचे आणि सैन्याचे आभार मानतो. सुरक्षितता आणि शांतीसाठी प्रार्थना करतो,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. अलीच्या या पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जास्मिन भसीननेही कमेंट केली आहे. ‘प्रार्थना आणि फक्त प्रार्थना’ असं तिने लिहिलं आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्यानंतर दहशवादाविरोधात मोठी कारवाई व्हावी अशी मागणी संपूर्ण भारतातून केली जात होती. या हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूरमुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाल्याचं समजंतय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List