तळाजवळील तारणे गावात भीषण अपघात, भरधाव डम्परची एसटीला धडक; चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये चिमुकलीचा समावेश
तळा तालुक्यातील तारणे गावात गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. धोक्याच्या वळणावर एका भरधाव डम्परने एसटीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत एसटीतील चारजण जागीच ठार झाले. या मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. या अपघातात 17 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहटाड येथून तळा येथे एसटीची बस (क्रमांक एम.एच. 20 -बी. 3214) निघाली होती. या बसमधून 52 प्रवासी प्रवास करीत होते. तळा नगरपंचायतीतील तारणे येथे ही एसटी आली असता विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या डम्परने (क्रमांक एन.एल. 01 -एएफ 9749) एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे एसटीच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात तृप्ती खुटीकर (22, रा. राहटाड कोळीवाडा), लक्ष्मण ढेबे (36, रा. धनगरवाडी), अनन्या गव्हाणे (7, रा. आंबेत), विठ्ठल कजबजे (55, रा. खांबवली) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घनेत 17 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर अवस्थेत असलेल्यांना पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
डम्परचालकाच्या हलगर्जीपणाचे बळी
एसटीतील चार प्रवाशांचे बळी हे दिनदयाळ रामकरण पाल या डम्परचालकाच्या हलगर्जीपणामुळे गेले आहेत. डम्परचालक हा 21 वर्षांखालील होता. आधीच डम्पर निकृष्टावस्थेत असताना तो त्याने प्रचंड वेगाने चालवल्याने वळणावर त्याचा ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली. त्याला तळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List