युद्धजन्य परिस्थितीत देशाने हिंदुस्थानी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी उभे राहणे हे राष्ट्रीय कर्तव्य! – संजय राऊत
युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार आणि हिंदुस्थानी सैन्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. कारण युद्धाच्या मैदानात आम्ही किंवा सरकार नाही, तर आपले लष्कर, नौदल आणि हवाई दल आहेत. त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण देशाने उभे राहिले पाहिजे. ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हणाले. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, आम्ही 1971 चे युद्ध पाहिले आहे. तेव्हापेक्षा आताचा पाकिस्तान कमजोर आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्यापुढे पाकिस्तान उभाच राहू शकत नाही, एवढी आपली तयारी आहे. आपले सैन्य पूर्णपणे प्रोफेशनल आहे. पाकिस्तानचे सैन्य अय्याश आणि सत्तेला हपापलेले आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा पाकिस्तानमध्ये सैन्य क्रांती करते आणि सत्ता ताब्यात घेते. हिंदुस्थानमध्ये आपले लष्कर फक्त युद्धासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार असते. आम्हाला पूर्ण खात्री आहे की हिंदुस्थानी सैन्य देशाचे रक्षण करण्यास आणि शत्रूला खडे चारण्यास समर्थ आहे.
गेल्या 72 तासांमध्ये हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पण सैन्यातर्फे जी माहिती येते त्याच्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे. युद्धाच्या वेळी खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणे बंद व्हायला पाहिजे. सैन्याचे मनोबल खाली जाईल असे कृत्य आपल्याकडून होऊ नये. सैन्याचे सिक्रेट मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणारे वार्तांकन टाळायला पाहिजे. हा संयम युद्धाच्या वेळी जनतेने आणि मीडियाने पाळावा. काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला. फेक न्यूज, अफवा आणि प्रोपोगंडा या तीनही गोष्टींवर सरकारने बंदी आणावी हे आम्ही काल संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितले, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडला असून चीननेही थेट हिंदुस्थानच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. चीनही हिंदुस्थानच्या विरोधात ठामपणे उभा राहणार नाही असे दिसते. कारण चीनने जी युद्धसामग्री पाकिस्तानला दिली होती ती आपण पाडली. चीनची विमानं उडण्याआधीच आपण ती हवेत नष्ट केली. त्यामुळे चीनची भीती वाटत नाही. या युद्धामुळे चीनचे मनोबलसुद्धा खाली जाईल, असेही राऊत म्हणाले.
पूर्ण देश हिंदुस्थानी सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा! उद्योगपतींनी केले जवानांचे कौतुक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List