तर अर्धे जग आपले चित्रपट पाहील, चीनचा उल्लेख करून आमीर खान नेमकं काय म्हणाला?
Aamir Khan : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये पहिलेवहिले विश्व ऑडिओ व्हिज्यूअल अँड एंटरटेन्मेंट समिट (WAVES) होत आहे. 1 मे ते 4 मे या कालात हे शिखर संमेलन होत आहे. दरम्यान या कार्यक्रमात दिग्गज अभिनेता आमिर खान याने हजेरी लावली. त्याने भारतीय चित्रपटांच्या प्रगतीवर सखोलपणे विश्लेषण मांडलं विशेष म्हणजे त्याने भारतीय सिनेसृष्टी आणि चीनच्या सिनेसृष्टीने सिनेमा तयार करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्या काळात मला याचा अनुभव आला
“गेल्या 10 वर्षांत मला चीनला जाण्याची संधी अनेकदा मिळालेली आहे. चीनचे प्रेक्षक, चीनची संस्कृती, चीनच्या लोकांच्या भावना या भारतीय लोकांसारख्याच आहेत. एखादा सिनेमा पाहून भारतीय लोक ज्या प्रकारे व्यक्त होतात, अगदी तशाच पद्धतीने चीनचे प्रेक्षकही व्यक्त होताना दिसतात. माझे काही चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले. त्या काळात मला याचा अनुभव आलेला आहे. भारतातील प्रेक्षकांनी दंगल चित्रपटाची जशी वाहवा केली, अगदी त्याच पद्धतीने चीनच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या,” असे आमीर खान म्हणाला.
दोन्ही देशांतील लोकांनी एकत्र येऊन..
तसेच पुढे बोलताना त्यांना भारत आणि चीन यांनी एकत्र मिळून चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “भारत आणि चीनमधील चित्रपटनिर्मात्यांनी एकत्र येऊन चित्रपट निर्माण करण्याची बरीच संधी मला दिसते. भारतात फार मोठा आणि वेगवेगळा विचार करणारा प्रेक्षकवर्ग आहे. चीनमध्येही उत्तम दर्जाचे क्रिएटिव्ह लोक आहेत. मी चीनमध्ये अनेकदा गेलेलो आहे. मी चीनमध्ये अनेक लाईव्ह इव्हेंट्स आणि चित्रपट पाहिलेले आहेत. त्यांची चित्रपटांची निर्मिती ही उच्च दर्जाची आहे. त्यामुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी ही उत्तम संधी आहे. या दोन्ही देशांतील लोकांनी एकत्र येऊन सोबत काम केले पाहिजे. ही एकत्र येण्याची बाब ही उद्योगाच्या पातळीवर असूदेत किंवा कलाक्षेत्रात असू देत. दोन्ही देशांसाठी ही चांगलीच बाब असेल,” असे मत आमीर खान यांनी व्यक्त केले.
चीनसोबत चित्रपटनिर्मिती करण्यासाठी…
इंडो-चायनीज चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर चीनचे कलाकार आणि भारतातील कलाकार एकत्र आले तर जगातील अर्धी लोकसंख्या ते चित्रपट पाहील. भारत आणि चीनची संस्कृती खूप जुनी आहे. या संस्कृतीचा आपला एक इतिहास आहे. या दोन्ही देशांकडे सांस्कृतिक पातळीवर देवाण-घेवाण करण्यासाठी बरंच काही आहे. त्यामुळे चीनसोबत चित्रपटनिर्मिती करण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, असेही मत आमीर खानने व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List