सामना अग्रलेख – धाडसी गांधी!
पण चुका आणि जबाबदारी स्वीकारण्याचे जे साहस राहुल गांधी दाखवतात ते साहस भाजप नेतृत्वात दिसत नाही. भाजप हा हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीवाहक नाही, तर ठेकेदार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी हिंदू विरोधकांच्या शेजेवर चढण्यासही ते तयार असतात. ही चूक आहे असे त्यांना वाटत नाही. ‘काँग्रेस रिकामी करा व भाजप वाढवा’, असा दिव्य मंत्र महाराष्ट्रात त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. या चुकांची जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवणारा नेता भाजपमध्ये आज नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारली व ते पुढे गेले. याला म्हणतात धाडस, दिलदारी व नेतृत्व. भाजप नेतृत्वाकडे या गुणांचा लवलेशही नाही!
राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे व हे ठसे कायमस्वरूपी राहतील. मोदी व शहांनी देशात विद्वेषाचे राजकारण सुरू केले. मात्र राहुल गांधी यांनी त्याला छेद देणाऱ्या ‘मोहोब्बत के दुकान’चे राजकारण सुरू केले. गांधी यांनी आता सांगितले की, ‘‘काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण पक्षाने इतिहासात जे काही चुकीचे केले त्याची जबाबदारी मी आनंदाने घेतो.’’ गांधी यांनी जे सांगितले ते सांगण्यास 56 इंचाची छाती लागते व गांधी यांच्याकडे ती आहे हे त्यांनी अलीकडे वारंवार दाखवून दिले. 1984 च्या शीखविरोधी दंग्याविषयी व त्याआधीच्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या बाबतीत राहुल गांधींनी जे मत मांडले ते धक्कादायक आहे. शिखांच्या भावनांना धक्का पोहोचवणाऱ्या या कृती होत्या. ‘ही पक्षाची चूक असेल तर त्याची जबाबदारी मी घेतो. काँग्रेसने अनेक चुका केल्या. त्या वेळी मी पक्षात नव्हतो, पण जर काही चुकले असेल तर मी जबाबदारी घेतो,’ असे सांगण्यास धाडस आणि वाघाचे काळीज लागते. गांधी यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीत विद्यार्थी व पत्रकारांशी केलेला संवाद प्रकाशित झाला. गांधी हे निर्मळ, स्वच्छ मनाचे कणखर नेतृत्व आहे हे त्यांच्या बोलण्यातून सिद्ध होते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले हा त्याच्या फौजफाट्यासह बसला होता. त्याने सगळ्यांना वेठीस धरले होते. सुवर्ण मंदिरात बसून तो खलिस्तानचे फूत्कार सोडीत होता व शीख समुदायाची माथी भडकवत होता. पाकिस्तानचे त्याला समर्थन होते. अशा वेळी भिंद्रनवाले व त्याच्या खलिस्तानी फौजांचा खात्मा करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालेचा खात्मा करण्यासाठी
सुवर्ण मंदिरात रणगाडे व सैन्य
घुसवले. भिंद्रनवाले मारला गेला. सुवर्ण मंदिरासही हानी पोहोचली. खलिस्तानी चळवळीचे कंबरडे तेव्हा मोडले नसते तर स्वतंत्र खलिस्तान पाकड्यांच्या मदतीने उभे राहिले असते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धाडसाने हे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ घडवले व त्याची किंमत प्राणाचे बलिदान देऊन त्यांना चुकवावी लागली. शीख अंगरक्षकांनीच पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. त्यानंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत अनेक शिखांना प्राण गमवावे लागले हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हे धाडस होते. त्या वेळेची ती गरज होती, पण शीखविरोधी दंगलीत काँग्रेस पुढाऱ्यांचा उघड सहभाग म्हणजे अक्षम्य अपराध होता. राहुल गांधी यांनी आता मोठ्या मनाने या चुकांची जबाबदारी स्वीकारली. खरे तर राहुल यांना हे असे करण्याची गरज नव्हती. श्रीलंकेच्या मदतीस भारतीय शांती सेना पाठवून जाफनात तामिळींचे अड्डे नष्ट करणे हेसुद्धा धक्कादायक होते व त्याची किंमत पुढे राजीव गांधींना चुकवावी लागली. तामीळ अतिरेक्यांनी राजीव गांधींची हत्या केली, पण धाडसी निर्णय घेण्याची कुवत काँग्रेस नेतृत्वात होतीच. कारण काँग्रेसचा पिंड हा स्वातंत्र्य लढा, संघर्ष, चळवळीतून तयार झाला आहे. भाजप नेतृत्वाने गेल्या पंधरा वर्षांत अनेक चुका केल्या. त्या चुकांची जबाबदारी ते घेणार आहेत काय? नोटाबंदीचा निर्णय हा देशाची अर्थव्यवस्था व मध्यमवर्गीय समाजाला उद्ध्वस्त करणारा होता. हजारो लोक बँकांच्या रांगेतच मरण पावले. अर्थव्यवस्थेचे बारा वाजले व मोदी चूक मान्य करायला तयार नाहीत. जीएसटीसारखे राक्षसी कायदे उद्योग-व्यापाराची वाट लावत आहेत. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवाद नष्ट होईल हे मोदी व शहांचे सांगणे होते, पण कश्मीरात नेमके उलटे घडत आहे.
पुलवामापासून पहलगामपर्यंतच्या
घटना धक्कादायक आहेत. जवान व निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले जात आहेत. या चुकांची जबाबदारी घेऊन अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, पण चुका मान्य करण्याची दानत भाजपमध्ये नाही. आपण जणू आकाशातील झग्यातून पडलो आहोत, अशा गुर्मीत भाजपवाले वावरत असतात. त्यामुळे चुका मान्य करणे वगैरे त्यांच्या चौकटीत बसत नाही. पुलवामा आणि पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांनाच घ्यावी लागेल, पण चुका आणि जबाबदारी स्वीकारण्याचे जे साहस राहुल गांधी दाखवतात ते साहस भाजप नेतृत्वात दिसत नाही. गांधी यांनी सांगितले की, ‘‘भाजप जे सांगतो, त्याला मी हिंदू विचार मानत नाही. हिंदू विचार अधिक बहुजनवादी, अधिक सर्वसमावेशक, अधिक प्रेमळ, सहिष्णू आणि मोकळा असल्याचे मी मानतो.’’ राहुल गांधी यांचे हे विधान ऐतिहासिक आहे. भाजप हा हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीवाहक नाही, तर ठेकेदार आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी हिंदू विरोधकांच्या शेजेवर चढण्यासही ते तयार असतात. याबाबतीत त्यांनी निर्लज्जपणाचा कहर चालवला आहे. सर्व पक्षांतील भ्रष्ट आणि व्यभिचारी लोकांना, गुंड टोळ्या चालवणाऱ्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. ही चूक आहे असे त्यांना वाटत नाही. ‘काँग्रेस रिकामी करा व भाजप वाढवा’, असा दिव्य मंत्र महाराष्ट्रात त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. या चुकांची जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवणारा नेता भाजपमध्ये आज नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारली व ते पुढे गेले. याला म्हणतात धाडस, दिलदारी व नेतृत्व. भाजप नेतृत्वाकडे या गुणांचा लवलेशही नाही!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List