भाजप व संघ जाती धर्माच्या नावावर विष पसरवून समाजात दुही माजवण्याचे काम – रमेश चेन्नीथला
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री फडणीस यावर काही बोलत नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्याला विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला. मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही, महिला आरक्षण विधेयक पास केले पण त्याची अंमलबजवाणी केली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला 27 टक्के आरक्षण आहे ते सुद्धा 65 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज 6 शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना 88 हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे, समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे.आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत. दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे. आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ. काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, असे वडेट्टीवार म्हणाले.
संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल
माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, भाजपा व रा. स्व. संघ जाती धर्मात वाद निर्माण करत तोडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. देशावर संकट येते, सामाजिक सौहार्द बिघडते तेव्हा सर्वात आधी काँग्रेस पक्ष समोर येतो. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करण्यात आली पण भाजपा युती सरकारवर त्याचा काही फरक पडला नाही. राहुल गांधी यांनी परभणीत येऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आज देशात संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल, संविधान वाचले तर सर्व जाती धर्माला न्याय मिळेल, असे नसीम खान म्हणाले.
भाजपाला संविधान बदलून मनुवाद आणायचा आहे
खासदार चंद्रकांत हांडोरे यावेळी म्हणाले की, भाजपा, रा. स्व. संघ, बजरंग दल देशात अराजक माजवण्याचे काम करत असून भाजपा सरकार त्यांना पाठबळ देते. भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरली असल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात पवित्र संविधान दिले, सर्वांन समान अधिकार,हक्क दिले आहेत पण भाजपाला हे संविधान बदलायचे आहे आणि मनुवाद आणायचा आहे. देशात सद्भाव वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस संविधान बचाव व सद्भावना यात्रा काढत आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्यास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत विजय वाकोडे यांचे स्मारक सरकारने बांधले नाही तर खासदार निधीतून आपण करू अशी ग्वाही दिली.
महायुतीत ‘तीन तिघाडा व काम बिघाडा’ !
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पहलगामला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले, हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली पण पंतप्रधान मोदी बिहारला प्रचार सभेला गेले. इंदिराजी गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला मग नरेंद्र मोदी कशाची वाट पहात आहेत. भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करत आहे पण काँग्रेस कमकुवत होणार नाही उलट महायुतीतच तिन तिघाडा व काम बिघाडा झाली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List