हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि हिंदुस्थान दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण कर्मचाऱ्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्ससह त्यांच्या संवेदनशील डेटाशी छेडछाड केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदुस्थानी लष्कराने हॅकर्सच्या कुरापतींबद्दल एक्सवर अधिकृत पोस्टद्वारे दुजोरा दिला आहे. ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ या हँडलने मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसच्या संवेदनशील डेटामध्ये प्रवेश मिळवला आहे. याशिवाय, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटमध्येही फेरफार करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी ध्वज आणि एआय वापरून वेबसाइटमध्ये फेरफार करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालयाने हॅकर्सच्या हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आर्मड व्हेईकल निगम लिमिटेडची वेबसाईट ऑफलाइन करण्यात आली आहे. हॅकर्सने कोणकोणता संवेदनशील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच त्या माध्यमातून संवेदनशील डेटाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्यासाठी व्यापक मूल्यांकन केले जात आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानला सायबर हल्ल्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सायबर विश्वात जागता पहारा ठेवून आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List