…तेव्हाच मोठी चूक झाली; ठाकरे बंधूंच्या युतीवर रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य
महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रापुढे आमचे वाद, भांडणं या किरकोळ गोष्टी आहेत, त्यामुळे एकत्र येण्यास मला तरी काही अडचण वाटत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
मी आणि बाळा नांदगावकर आम्ही दोघांनी ठाकरे बंधुंना एकत्र यावेत यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरेंच्या समोर हात पुढे केला. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे कधीच हा म्हटले नाहीत. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. राज ठाकरे यांची त्यावेळची मागणी होती, आम्हाला फक्त दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि दुसरा नाशिक असं कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत, त्यावेळीला महाबळेश्वरमध्ये आमच्याकडून मोठी चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना पक्षाचं अध्यक्ष केलं. त्याचवेळी राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला पाहिजे होतं. राज ठाकरे जर अध्यक्ष झाले असते तर, शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते, शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे वाघासारखा माणूस आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहिले तर राज ठाकरे त्यांच्यासोबत युती करतील असं मला वाटत नाही. कारण राज ठाकरे स्वाभिमानी माणूस आहे. मात्र दोन्ही भाऊ एकत्र आले, कुटुंब म्हणून एकत्र आले तर आनंद होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List