उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर 17 हजार गुन्हे…उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसे नेत्याचा सवाल
राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे दोन दिवसांपासून भूमिका मांडत आहे. राज ठाकरे यांची मुलाखत फक्त निवडणुकीच्या युतीपुरती नाही तर महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोणाला महाराष्ट्रद्रोही? असे प्रमाणपत्र देऊ नये. ते मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर 17 हजार गुन्हे दाखल झाले होते, त्याबद्दल ते मनसे सैनिकांची माफी मागणार का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला.
संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, युतीचा विषय केवळ निवडणुकीपुरता नाही. आता कोणती निवडणूक आहे? जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकीचा विचार करु. आता विषय हिंदी सक्तीचा विषय आहे. परप्रातींयांचा विषय आहे. बँकांमध्ये मराठीचा वापर होत नाही, तो विषय आहे. त्यावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रद्रोही असलेल्यासोबत मनसेने राहू नये, ही अट युतीसाठी ठेवली. त्याचा समाचार संदीप देशपांडे यांनी घेतला. ते म्हणाले, ‘भाजपने कोण हिंदुत्ववादी कोण नाही, हे प्रमाणपत्र देऊ नये. तसेच शिवसेना उबाठानेही हा महाराष्ट्रद्रोही आहे, असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर १७,००० गुन्हे दाखल झाले होते. ती चूक उद्धव ठाकरे यांना वाटते का? ते त्याबद्दल मनसेची माफी मागणार का?,’ असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला.
तामिळनाडूत जेव्हा राज्याचा विषय येतो, तेव्हा राज्यातील सर्व पक्षीय आमदार एकत्र येतात. तसेच महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीत मांडल्याचे माझ्यासारख्या कार्यकर्त्यास वाटले, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत उबाठा आणि मनसे युती ऐवढी संकुचित नाही. त्यात अनेक विचार आहेत. मराठी माणसांचे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आल्यावर तू ही लढ, मी ही लढतो, एवढा संकुचित विचार राज साहेबांनी मांडला नाही.’
२०१७ मधील युतीच्या सर्व प्रक्रियामध्ये मी होतो. त्यावेळी आमची कशी फसवणूक झाली, ते मी सांगितले आहे. त्यावेळी बाळ नांदगावकर स्वत: दादरवरुन मातोश्रीवर गेले होते. परंतु उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List