नांदगाव तलाव प्रदूषण स्थानिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला घातक, आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी
500 मेगावॅटच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून निर्माण होणारी राख ही नांदगावमधील तलावात टाकली जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. हे केंद्र राख टाकताना कोणतेही नियम पाळत नसल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाचा प्रश्न तसेच जिह्यातील प्रत्येकाच्या उपजीविकेलाही धोका निर्माण झाला आहे. याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.
नागपूरमध्ये खापरखेडा गावात कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीज केंद्रांतून वीजनिर्मिती केली जाते, मात्र ही वीजनिर्मिती होताना त्यातून पर्यावरणाला धोकादायक अशी राख निर्माण होते. राखेची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावत नसल्यामुळे मानवी वस्तीसह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, असे पत्र आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना लिहिले असून याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
एजन्सीला दंड करून डम्पिंगला पुन्हा बंदी घालावी!
2022 मध्ये मी तत्कालीन मंत्री असताना ‘फ्लाय अॅश’ डम्पिंगवर बंदी घातली होती. खेदाची गोष्ट म्हणजे सध्याच्या सरकारने ही बंदी उठवली. या राखेच्या प्रदूषणामुळे केंच नदी, कान्हा नदीही प्रदूषित होत आहे. आजपर्यंत औष्णिक वीज केंद्रातून टीपीपीच्या इतर मूलभूत गोष्टीदेखील नाहीत. अशास्त्रीय राख डम्पिंगसाठी टीपीपीच्या ऑपरेशनल एजन्सीला दंड करावा आणि त्यावर पुन्हा बंदी घालावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
राखेचा वापर रस्त्यांच्या बांधकामांसाठी करा!
फ्लाय अॅशचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांमध्ये केला जाऊ शकतो किंवा त्याचा लिलावदेखील केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर, अशी फ्लाय अॅश तयार होत आहे, याचा अर्थ वीजनिर्मितीसाठी खराब प्रतीचा कोळसा वापरला जात आहे. त्यासाठी करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे, ही चिंतेची बाब आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List