‘….अन्यथा मराठी तरुणांची फक्त डोकी फुटतील’; राज, उद्धव ठाकरे युतीसंदर्भात बड्या नेत्याचं मोठं भाकीत
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावत प्रतिक्रिया देताना माजी शिक्षक आमदार कपील पाटील यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले कपील पाटील?
‘ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाज मनावर आहे. नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण दोन भावाचं भांडण संपल्याने, महाराष्ट्राचा, मराठीचा प्रश्न सुटेल का ? मुंबई बाहेर फेकला गेलेला, बदलापूर – नालासोपारा – पनवेलला विस्थापित झालेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल का ? गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना मुंबईत घर मिळेल का ? सत्ता असूनही गेल्या 25 वर्षात आजारी पडलेली बीएमसी हॉस्पिटलं बरी होतील का ? पालिकेतली कंत्राटं मराठी माणसाला मिळतील का ? राज ठाकरेंनी सर्वच पक्षातल्या मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याचं काय?
ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाज मनावर आहे. नाकारण्याचं काहीच कारण नाही.
पण दोन भावाचं भांडण संपल्याने,
● महाराष्ट्राचा, मराठीचा प्रश्न सुटेल का ?
● मुंबई बाहेर फेकला गेलेला, बदलापूर – नालासोपारा – पनवेलला विस्थापित झालेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल का ?
● गिरणी…— Kapil Patil (@KapilHPatil) April 20, 2025
मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का? मान्य करा न करा, निवडणूकीत लोक मान्यता मिळालेले सामान्य बहुजन शिवसैनिकांचा चेहरा बनलेले एकनाथ शिंदे, कोकणी माणसाचे नारायण राणे, ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, हे तर मूळ शिवसैनिकच. मग ते का नकोत ? मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, जरांगे पाटलांचा गरजवंत मराठा आणि आंबेडकरांचा बौद्ध समाज हे सर्व मराठीच्या परिघात येत नाहीत का ? तामिळनाडूत हिंदूच राहतात. पण हिंदुत्ववादी राजकारणाला त्यांनी थारा दिला नाही. म्हणून ते टिकले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी राजकारणाने मराठी भाषिकांचं राजकारण आणि महाराष्ट्र धर्मही बुडवला. त्याचं काय ? एकत्र येऊन या प्रश्नांना उत्तरं मिळणार असतील तर स्वागतच. अन्यथा मराठी तरुणांची डोकी फक्त फुटतील.’ असं ट्विट कपील पाटील यांनी केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List